रुपाली चाकणकरांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही उचलबांगडी होणार? देवगिरी बंगल्या

रुपाली चाकणकर : विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी लागेबांधे असल्यामुळे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गमवावे लागलेल्या रुपाली चाकणकर यांना लवकरच आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अशोक खरातला गुरु करुन घेतल्यामुळे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीकेची प्रचंड झोड उठवण्यात आली होती. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला गुरु मानणारी महिला महिला आयोगाची अध्यक्ष कशी काय असू शकते, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर यांना नाईलाजाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यापाठी लागलेला ससेमिरा कमी होईल, असे वाटत होते. मात्र, आता रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपदावरुनही उचलबांगडी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची होणारी बदनामी कशी रोखता येईल, यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. त्यासाठी रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले जाऊ शकते. काल देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरु असताना रुपाली चाकणकर यांना तसा संदेश धाडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर लवकरच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात. रुपाली चाकणकर यांच्यानंतर राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करायची, याबाबतही काल देवगिरी बंगल्यावरील बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

Sunil Tatkare: सुनील तटकरे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले?

सुनील तटकरे हे रुपाली चाकणकर यांचे राजकीय गॉडफादर असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्यासोबतच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर सुनील तटकरे यांनीही रुपाली चाकणकर यांच्यावरील वरदहस्त काढून घेतल्याची चर्चा रंगली आहे. सुनील तटकरे यांना रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी म्हटले की, या विषयावर चर्चा होईल, तेव्हा निर्णय घेतला जाईल. पक्षाकडून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अशोक खरात याने दुष्कृत्य केले आहे आणि एसआयटीकडून त्याची सखोल चौकशी व्हावी, ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील. हा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी शिफारस आम्ही मुख्यमंत्र्यांना करु, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो; तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा

आणखी वाचा

Comments are closed.