तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, ‘मी महिला, प्रवास जमणार नाही’; दमानियांची चाकणकरांवर टीक
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी लागेबांधे असल्यामुळे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता चौकशीची टांगती तलवार आहे. रुपाली चाकणकर यांना एसआयटीने अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात चौकशीसाठी पाचारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यासाठी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना समन्सही पाठवण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, रुपाली चाकणकर चौकशीसाठी गेल्या नव्हत्या. यावरुन सामाजिका कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांना खडेबोल सुनावले आहेत. (Nashik Crime News)
रुपाली चाकणकर या चौकशीसाठी एसआयटीसमोर जाणार नाहीत, अशी माहिती मला मिळाली. त्यांनी दिलेलं कारणही क्षुल्लक होतं. मी महिला आहे. मला प्रवास करायला त्रास होईल, असे त्यांनी सांगितले. पण यापूर्वी आपण रुपाली चाकणकर यांना अनेकदा नाशिकला जाताना पाहिले आहे. तिकडे जाऊन अशोक खरातचे पाय पदराने पुसताना, केक खाताना रुपाली चाकणकर यांना पाहिले आहे. मात्र, आता त्यांनी एसआयटी चौकशीला नकार दिला आहे. मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जात असल्याने नाशिकला येता येणार नाही, असे अजब कारण त्यांनी दिले आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
एसआयटीने पहिले समन्स पाठवून त्या आल्या नाहीत. आता एसआयटीने त्यांना दुसरे समन्स पाठवावे. त्यानंतरही रुपाली चाकणकर चौकशीसाठी आल्या नाहीत तर एसआयटीला कोर्टाकडून आदेश घ्यावे लागतील. पहिले चाकणकर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट घ्यावे लागले. त्यानंतर अजामीनपात्र वॉरंट घेऊन रुपाली चाकणकर यांना अटक करावी लागेल. त्यामुळे आता बघू रुपाली चाकणकर यांना कधी बुद्धी येते आणि त्या कधी एसआयटीपुढे जातायत? पण त्या आज चौकशीसाठी गेल्या नाहीत यावरुन बरंच काही कळून येते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम रुपाली चाकणकर यांचे फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाद्यपूजन करताना आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरताना दिसून आल्या होत्या. त्या अशोक खरात याच्या इशान्येश्वर मंदिराच्या ट्र्स्टच्या सदस्य होत्या. त्यामुळे रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.