रशियाचा युक्रेनच्या राजधानीवर एअर स्ट्राईक, स्फोटाने कीव्ह हादरले; चार नागरिकांचा मृत्यू
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आसपासच्या भागांवर मोठा क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, तर 80 हून अधिक लोक जखमी झाले. रशियाने कीव्ह शहराला लक्ष्य करत युक्रेनच्या दिशेने 90 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि 600 हून अधिक ड्रोन डागले. गेल्या एका वर्षातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे समजते. हल्ल्यादरम्यान संपूर्ण युक्रेनमध्ये एअर रेड अलर्ट जारी करण्यात आला.
कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या जवळपास प्रत्येक भागात नुकसान नोंदवले गेले आहे. अनेक निवासी इमारती, घरे, सुपरमार्केट, शॉपिंग सेंटर्स, कार्यालये, गोदामे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. काही इमारतींचे अनेक मजले पूर्णपणे कोसळले. अहवालानुसार, कीव्हव्यतिरिक्त आसपासच्या अनेक भागांमध्येही हल्ले झाले आहेत. अनेक ठिकाणी आग लागली आणि बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हल्ल्यापूर्वी इशारा दिला होता की, रशिया मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. हल्ल्यानंतर पोलंडही अलर्ट मोडवर गेले आहे.
Comments are closed.