युक्रेनमधील ल्विव्ह शहरावर रशियाचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; अनेक जण जखमी
रशियाने युक्रेनच्या पश्चिमेकडील ल्विव्ह शहरावर केलेल्या भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात निवासी इमारती, ऊर्जा प्रकल्प आणि रेल्वे स्थानकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
युरो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एका कारमधील डॅशकॅममध्ये या हल्ल्याचा थरार कैद झाला आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी ल्विव्हमधून प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकाच्या अगदी समोरच रस्त्यालगतच्या एका इमारतीवर क्षेपणास्त्र आदळले. स्फोटामुळे इमारतीचे ढिगारे रस्त्यावर विखुरले, ज्यामुळे चालकाने तात्काळ कार मागे घेत घटनास्थळावरून पळ काढला.
निवासी भाग आणि ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान
हा हल्ला ल्विव्हमधील झालिझ्निचनी जिल्ह्यात झाला. यामध्ये अनेक निवासी इमारती आणि गॅरेजला आग लागली असून मालमत्ता व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्बहल्ल्यात निवासी इमारती, एक वसतिगृह, एक गोदाम आणि महत्त्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना फटका बसला आहे. तसेच, स्कनिलिव्ह रेल्वे स्थानकावरील तिकीट टर्मिनलचेही नुकसान झाले आहे.
ल्विव्ह शहराबाहेर शेजारील झोलोचिव्ह जिल्ह्यातही या हल्ल्याचे पडसाद उमटले. पाडण्यात आलेल्या रशियन ड्रोनचे अवशेष पडून तीन घरे आणि एका वाहनाचे नुकसान झाले, तर आणखी एक व्यक्ती जखमी झाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, या हल्ल्यात रशियाने ४०० हून अधिक लढाऊ ड्रोन आणि ११० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. कीव्हसह युक्रेनच्या इतर अनेक भागांनाही या हल्ल्याचा फटका बसला आहे.
Comments are closed.