रशियाचा डाव; युक्रेनच्या जवानांना संपवण्यासाठी युक्रेनच्याच तरुण मुलींचा हनी ट्रॅप! पोलीस प्रमुखांचा आरोप

रशिया-युक्रेन युद्ध बऱ्याच काळापासून सुरू आहे. या युद्धात विविध शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. आता रशियानं युक्रेनच्या सैनिकांना संपवण्यासाठी नवा डाव आखला आहे असे वृत्त समोर येत आहे. युक्रेनच्या एका जवानाची हत्या केल्याच्या संशयावरून १७ वर्षांच्या एका मुलीला अटक करण्यात आली. तिच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाकडून युक्रेनच्या तरुण मुलींना युक्रेनियन सैनिकांची हत्या करण्यासाठी आपल्या जाळ्यात ओढले जात असल्याचा गंभीर आरोप युक्रेनच्या पोलीस प्रमुखांनी केला आहे.

युक्रेनमधील एक वृत्तसंकेत स्थळ ‘सेन्झोर डॉट नेट’ (Cenzor.NET) द्वारे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत राष्ट्रीय पोलीस प्रमुख इव्हान विहिव्स्की यांनी सांगितले की, या वर्षात टेलिग्राम मेसेजिंग ॲपद्वारे सुपारी देऊन हत्या घडवून आणण्याची ६ प्रकरणे समोर आली आहेत. यातील एक हत्या रोखण्यात पोलिसांना यश आले.

ते म्हणाले, ‘आम्ही रशियाच्या गुप्तचर यंत्रणांनी कट रचलेल्या आणि युक्रेनच्याच नागरिकांनी प्रत्यक्षात केलेल्या नियोजित हत्येच्या प्रकरणांबद्दल वस्तूस्थिती जाणून घेऊन ती मांडत आहोत.’ मात्र रशियाची गुप्तचर संस्था ‘एफएसबी’ (FSB) यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकली नाही.

विहिव्स्की यांनी सांगितले की, रशियन एजंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुण मुलींना शोधतात, त्यांना सहज पैशांचे आमिष दाखवतात आणि दूरवरूनच त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतात.

या तरुण मुलींना डेटिंग वेबसाईट्सवर युक्रेनियन लष्करी जवानांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या आणि त्यांना भेटण्यासाठी फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी त्यांच्या हँडलर्सकडून पैसे मिळत असत, असे विहिव्स्की यांनी सांगितले.

युक्रेनच्या सुरक्षा संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या काळात स्वतःच्या देशाशी गद्दारी करून आग लावणे, दहशतवाद किंवा घातपात केल्याचा आरोप १,१०० हून अधिक युक्रेनियन नागरिकांवर ठेवण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पश्चिमेकडील झिटोमिर (Zhytomyr) प्रांतात एका सैनिकाला विष दिल्यानंतर पोलिसांनी १७ वर्षांच्या एका मुलीला ताब्यात घेतले आणि ती टेलिग्रामच्या माध्यमातून रशियन गुप्तचर यंत्रणेचा एजंट असण्याची शक्यता असलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे सांगितले.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, तिला एक पार्सल मिळाले होते ज्यामध्ये स्फटिकासारखा पदार्थ (क्रिस्टलाईन सबस्टन्स) होता आणि तो मेथॅडोन असावा असा पोलिसांचा संशय आहे.

Comments are closed.