हॅलो, बावनकुळे साहेबांचा पीए बोलतोय; संभाजीनगरमधील शेतकऱ्याला क्यूआर पाठवला, पैशांची मागणी
संभाजीनगर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांच्या नावाने फोन करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावरून, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. एका शेतकऱ्याला आपण, बावनकुळे साहेबांचे पीए असल्याचे सांगत एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तुमचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, स्कॅनर पाठवत पैसे पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने (Farmer) संभाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
जगन्नाथ जयाजी शेळके असं तक्रादार शेतकऱ्यांचे नाव असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवरती त्यांनी आपली अडचण मांडली होती, यासंदर्भातील तक्रारीची माहिती फेसबुकवरुन शेअर केली होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवून माझी वडिलोपार्जित शेती पडीक पाडली आहे, त्यामुळे मला लागवड करता येत नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने पीडित शेतकऱ्याला फोन केला की, मी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पी.ए. बोलत असल्याचे सांगून रस्त्याची मोजणी करण्यासाठी माणसे पाठवतो. मात्र, पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरावे लागतील, त्यासाठी क्यूआर कोड पाठवत पैशांची मागणी संबंधित व्यक्तीने केली होती. दोघांमध्ये फोनवरुन संभाषण झालं होतं, शेतकऱ्याने ते संभाषणही पोलिसांपुढे दाखल केलं आहे.
पीडित शेतकऱ्याला अशाप्रकारे दोनदा अज्ञात व्यक्तीने पैशाची मागणी केली. त्यावेळी, आपलं काम मार्गी लागेल म्हणून शेतकऱ्याने 3 हजार रुपये देखील पाठवले होते. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचा संशय शेतकऱ्याला आहे. शेतकऱ्याला संशय आल्याने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर करत शेतकऱ्याची फसवणूक करणारा हा व्यक्ती कोण? याचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. सध्या, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा
मुंबईत आणखी एका गोविंदाचा मृत्यू, काविळमुळे जीव गमावल्याचे समोर; दहीहंडी उत्सवात 318 गोविंदा जखमी
आणखी वाचा
Comments are closed.