अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की…

मुंबई : अशोक खरात प्रकरणात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे संबंधित महिलांची ओळख समोर येत आहे. या प्रकरणात पोलीस आता योग्य ती कारवाई करत असून नगर आणि नाशिकमध्ये काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik IPS) यांनी दिली. या प्रकरणात अनेक सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आल्याचंही ते म्हणाले. तसेच जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत ते अशोक खरातच्या ऑफिस बॉय आणि इतरांकडून बाहेर आल्याचं त्यांनी सांगितलं. संदीप कर्णिक यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक (Coffee With Kaushik) या कार्यक्रमात संवाद साधत होते.

अशोक खरात आतापर्यंत ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्यावरून मुख्यमंत्र्यांनी किती भक्कम भूमिका घेतली आणि नंतर पोलिसांनी कशी कारवाई केली हे समोर येतं. या प्रकरणात पोलीस जलदगतीने तपास करतील आणि आरोपीला योग्य ती शिक्षा मिळेल असं संदीप कर्णिक म्हणाले.

Ashok Kharat Viral Video : व्हिडीओ पोलिसांकडून व्हायरल झाले का?

खरात प्रकरणातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यासाठी पोलीस दोषी आहेत का असा प्रश्न कर्णिक यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना कर्णिक म्हणाले की, “कोणताही व्हिडीओ पोलिसांकडून व्हायरल झालेला नाही. खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयने हे व्हिडीओ काढले होते. त्याच्या माध्यमातून हे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. त्या ऑफिस बॉयने त्याच्या जीवाच्या भीतीने काही व्हिडीओ लपवून ठेवले होते. नंतर ते व्हिडीओ बाहेर आले.”

काही लोकांनी मूळचे व्हिडीओ मॉर्फ करत त्या ठिकाणी इतर महिलांचे व्हिडीओ टाकले असल्याचं संदीप कर्णिक यांनी सांगितलं. अशा प्रकरणात पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

Nashik Ashok Kharat Case : नाशिक, नगरमध्ये गुन्हे दाखल

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे संबंधित महिलांची ओळख होत आहे. त्यावर कारवाई सुरू आहे. त्यासाठी नगर, नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले असून अनेक अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत अशी माहिती संदीप कर्णिक यांनी दिली.

खरात हा शातीर गुन्हेगार आहे. जोपर्यंत त्याच्यासमोर आम्ही भक्कम पुरावे आणि फॅक्ट्स ठेवत नाही तोपर्यंत त्याची स्टोरी सांगत जाणार. त्याने अनेक कहाण्या तयार केलेल्या आहेत, पण आम्ही त्याला पुराव्यांच्या आधारे गुन्हे मान्य करण्यास भाग पाडू असं संदीप कर्णिक म्हणाले.

अशोक खरातने त्याच्या फार्म हाऊसवर नरबळी आणि प्राण्यांची बळी दिल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता, अधिक तपास केल्यानंतर माहिती समोर येईल असं संदीप कर्णिक म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.