संगमनेरला गढूळ पाण्याचा विळखा! साथीच्या आजारांनी रुग्णालये भरली प्रशासनाच्या आकडेवारीवर सवाल
संगमनेर शहरातील नळाला पाणी येते की गढूळ पाण्यातून आजारांचे संकट, असा सवाल करण्याची वेळ संगमनेरकरांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी असतानाच, साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, पोटदुखी, पाठदुखीपासून डेंग्यू, मलेरिया, कावीळ आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांमुळे खासगी दवाखाने व रुग्णालये भरून गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रशासन आणि खासगी रुग्णालयांकडून येणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीवर सवाल उठत आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण सुमारे 50 टक्क्यांनी घटल्याने दुष्काळाचे संकट निर्माण झाले. मात्र, पावसाच्या काही टप्प्यांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे, आढळा आदी धरणे भरली आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही काळासाठी सुटला. धरणांमधून पाणी सोडले जात असताना शहराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक दिवसांपासून गढूळ व दूषित पाणी नळातून येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घरगुती उपाय म्हणून तुरटी फिरवून पाणी भरून ठेवले की दुसऱ्या दिवशी तळाशी गाळ साचलेला दिसतो.
दूषित पाण्याबरोबरच साथीच्या आजारांची लक्षणे वाढत असल्याने शहरातील रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पाठदुखी, पोटदुखी, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांच्या तक्रारी घेऊन रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शहरात नियमित फवारणी होत नसल्याची तक्रार रुग्णांकडून करण्यात येत आहे.
एका महिन्यात डेंग्यूचे आठ रुग्ण
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2026 मध्ये डेंग्यूचे 73 नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी 8 नमुने दूषित आढळले आहेत. चिकुनगुनियाचे 4 नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी एकही नमुना दूषित आढळलेला नाही. मलेरियाचे 9 हजार 149 नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी एकही नमुना दूषित आढळला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारी आकडेवारी आणि खासगी रुग्णालयांमधील प्रत्यक्ष चित्र यात बरीच तफावत असल्याचे स्पष्ट होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि अन्य साथीच्या आजारांच्या संशयित रुग्णांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे.
Comments are closed.