बाळासाहेब थोरातांच्या शहरातच पंजा चिन्ह गायब, नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र आघाडी


अहिल्यानगर संगमनेर वार्ता: महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या संगमनेर शहरातून काँग्रेसचं पंजाचे चिन्ह गायब झालं आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीसह (Sangamner Nagarpalika Election ) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता आणि शिर्डी नगरपालिकेत पंजा ऐवजी स्थानिक विकास आघाडी निर्माण करून स्वतंत्र चिन्हावर काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणार आहे. काँग्रेसमधून निलंबित असलेले आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने महाविकास आघाडी ऐवजी संगमनेर सेवा समिती स्थापन करुन बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलं आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात तब्बल सात निवडणुका बाळासाहेब थोरात यांनी पंजा या चिन्हावर लढवीत विजय मिळवला आहे. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत न जाता थोरात यांनी काँग्रेसमध्ये राहणंच पसंत केलं. सुसंस्कृत व एकनिष्ठ अशी ओळख असलेले बाळासाहेब थोरात यांच्या शहरात मात्र यावेळी नगरपालिका निवडणुकीतून काँग्रेस चिन्हच हद्दपार झाले आहे. संगमनेर नगरपालिकेत यावेळी सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समिती स्थापन करुन निवडणूक लढवली जात आहे. व या समितीत काँग्रेससह उबाठा सेना देखील सहभागी झाली आहे. मात्र या निवडणुकीत पक्ष चिन्ह न घेता स्वतंत्र चिन्ह घेण्याचा निर्णय सेवा समितीने घेतल्याने काँग्रेस सह उबाठा सेनेचे चिन्ह देखील हद्दपार झाल आहे.

समविचारी पक्षांना एकत्र घेत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळेल

समविचारी पक्षांना एकत्र घेत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळेल हे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला अनेकांना सामावून घ्यायचे असल्यानं चिन्ह वाढले की प्रश्न तयार होतात. त्यामुळं एकच स्वतंत्र चिन्ह घेऊन विचारधारेच्या विरोधात लढण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे थोरात म्हणाले. आम्हाला यश मिळवायचं आहे. त्यामुळं समविचारी लोकांना आम्ही एकत्र केलं आहे. त्यामुळं काही निर्णय आम्हाला घ्यावे लागतात. काँग्रेस हा एक विचार आहे आणि तो आमच्या मनात असल्याचं  वक्तव्य थोरांतानी केलं आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर सेवा समितीची स्थापना

बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे व जावई सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षातून निलंबित केलं होतं. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यावेळी सत्यजित तांबे यांच्या आई दुर्गा तांबे यांच्या ऐवजी पत्नी मैथिली तांबे निवडणूक रिंगणात आहेत. ज्या पक्षातून निलंबित आहेत, त्याचा प्रचार करता येणे शक्य नसल्याने सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर सेवा समितीची स्थापना केली आहे. सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळण्यासाठी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे एबी फॉर्म वापरून सिंह ही निशानी येऊन निवडणूक रिंगणात उतरले आहे. विविध पक्षातील समविचारी लोकांना एकत्रित केल्यामुळे पक्ष चिन्हाची अडचण येऊ नये म्हणून आम्ही समिती स्थापन केल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

मतांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी त्यांनी आघाडी, अमोक खताळांची थोरातांवर टीका

संगमनेर नगरपालिका निवडणुकीतून काँग्रेस चिन्ह गायब झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव करणारे  शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी देखील थोरात यांच्यावर टीका केलीय. काहींजण आपल्याला राष्ट्रीय पक्षाचे नेते समजून अहिल्यानगर जिल्ह्यासह बाहेरच्या राज्यात काँग्रेस पक्षासाठी बैठका घेतात. त्यांना आपल्या गावातच पंजाच चिन्ह देता आलं नाही. मतांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी त्यांनी आघाडी जरी केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून त्यांना उत्तर देऊ त्यांना आघाडीसाठी शुभेच्छा असा टोला अमोल खताळ यांनी लगावलाय.

संगमनेर नगरपालिकेत संगमनेर सेवा समितीने सिंह ही निशाणी

नाशिक पदवीधर निवडणुकीत देखील राजकीय घडामोडींमुळं काँग्रेसची उमेदवारी मिळून देखील सुधीर तांबे उमेदवार झाले नाहीत आणि त्यावेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत विजय मिळवला होता. संगमनेर नगरपालिकेत संगमनेर सेवा समितीने सिंह ही निशाणी घेतली असून बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली पहिली विधानसभा निवडणूक काँग्रेस विरोधात अपक्ष लढताना सिंह हीच निशाणी घेतली होती.

महत्वाच्या बातम्या:

Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात

आणखी वाचा

Comments are closed.