आटपाडीत अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं, राजकीय हस्तक्षेप अन् गोपीचंद पडळकर, सुहास बाबरांचं नाव

सांगली: आटपाडी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी आरोपांच्या फैरी झडत आहेत. आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आधी भाजपच्या नेत्यांनी शिंदेंचे आमदार सुहास बाबर यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. नंतर शिंदे गटाकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली.

भाजप तालुकाध्यक्षांनी आमदार सुहास बाबर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला. बाबर यांच्या कॉलची तपासणी करावी अशा मागणीचे निवेदन दिले. तर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने तपासावेत अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केली. याबाबत आटपाडी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

संगली अटपादी मुलीची आत्महत्या:नेमकं काय आहे प्रकरण?

आटपाडी तालुक्यातील करगणी गावात एका दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. आत्महत्येमागे शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप केला जात आहे. शारिरीक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्यानेच त्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी करगणी गावातील चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून दुर्लक्ष, गावकऱ्यांचा आक्रोश

घटनेनंतर ग्रामस्थांनी चार आरोपींपैकी दोन तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यातील एकाला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला होता. मात्र, संध्याकाळपर्यंत पोलिसांकडून कोणतीही तक्रार नोंदवली गेली नव्हती. पोलिसांनी फक्त आत्महत्येचे कारण नोंदवले गेले. हे लक्षात येताच पीडितेचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत मृतदेहासह पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. यानंतरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

राजकीय हस्तक्षेपाचा संशय

आधी भाजपच्या नेत्यांनी सुहास बाबर यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. नंतर शिंदे गटाकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. पोलीस तपासात दिरंगाई झाली, गुन्हा उशिरा दाखल झाला, त्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कॉल डिटेल्सची मागणी

या घटनेवर विधानसभेतही आवाज उठवण्यात आला आहे. खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी या घटनेची सखोल चौकशी करून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा थेट आरोप केला असून, याची चौकशी करण्यासाठी आटपाडी पोलिस निरीक्षक तसेच पडळकर बंधूंचे कॉल डिटेल्स तपासावेत, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.