साहिबजादा फरहानची बॅटनं गोळीबाराची ॲक्शन, संजय राऊत यांचा BCCI सह मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आशिया चषकात सुरु असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यातील एका प्रसंगावरुन बीसीसीआय आणि मोदी सरकारवर टीका केलेली आहे. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याच्या अर्धशतकानंतरच्या फायरिंग स्टाईल सेलिब्रेशनवरुन संजय राऊत यांनी बीसीसीआय आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

संजय राऊत यांचं ट्वीट जसंच्या तसं (Sanjay Raut on Sahibzada Farhan Celebration)

आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडले.
साहिबजादा फरहान याचे अर्ध शतक लागताच त्याने मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली,
पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता
बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे.
भारताचे लष्कर आणि पुलवामा पहेलगाम मध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे,
अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत!

भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांसोबत सामने खेळू नये अशी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी भारत पाकिस्तान सामना खेळवला जाऊ नये अशी भूमिका 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मॅचवेळी घेतली होती. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हॉटेल आणि इतर ठिकाणी मॅच दाखवू नये, अशी भूमिका घेतली होती.  ज्या रेस्टॉरेंट आणि क्लब मध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामना दाखवला जाईल त्या ठिकाणांची माहिती राष्ट्रभक्त जनतेने समाजमाध्यमांवर सार्वजनिक करावी, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं होतं. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं माझे कुंकू, माझा देश हे अभियान राबवलं होतं.

भारतापुढं 171  धावांचं आव्हान

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमने सामने आले आहेत. भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. साहिबजादा फरहान याचा कॅच अभिषेक शर्मानं सोडला होता. त्यानंतर साहिबजादा फरहान यानं अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली होती. याच साहिबजादा फरहान यानं अर्धशतक झाल्यानंतर फायरिंग स्टाईल सेलिब्रेशन केलं. तो 58 धावा करुन बाद झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. सॅम अयूब 21 धावा, मोहम्मद नवाझ 21 आणि फहीम शरीफनं 20  धावा करत पाकिस्तानला 171 धावांपर्यंत पोहोचवलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.