स्वतंत्र देश 2014 मध्ये खड्ड्यात गेला, मोदींनी धार्मिक देशाला धर्मांध केलं, ट्रम्प रोज बूच मारत

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊत: स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2025) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूर, सिंधू जल करार, पाकिस्तानची कारवाया, दहशतवादाच्या मुद्द्यावर परखडपणे भाष्य केलं. तर ‘आत्मनिर्भर भारत’ हा विकसित भारताचा पाया असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणातून अमेरिकेला देखील इशारा दिला. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, अनेक ठिकाणी झेंडे फडकले आहे, तिरंगा फडकला आहे. आजही या देशात बेरोजगारी, भूक, कायदा सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याबाबत गंभीर समस्या आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता 75 वर्षाचे होतील आणि देशाचे स्वातंत्र्य 79 वर्षाचे झाले आहे. या 79 वर्षात देश नक्कीच प्रगतीपथावर गेला आहे. जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागा देखील बनत नव्हता. आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला आहे. त्याचे श्रेय या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जाते. काही लोकांना वाटत आहे की, 2014 साली देश स्वतंत्र झाला. पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला आहे. प्रत्येक पंतप्रधानांनी काही ना काहीतरी योगदान दिलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे दहा वर्षात योगदान इतकेच आहे की, हा देश धार्मिक होता, तो त्यांनी धर्मांध केला आहे. ही धर्मांधता या देशात जातीय धार्मिक फुट पाडत आहे आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे, असे त्यांनी म्हटले.

स्वदेशीचा नारा म्हणजे काँग्रेस पक्षाची देणगी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर बोलताना स्वदेशीचा नारा दिला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आधी त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी. स्वदेशीचा जो त्यांनी नारा दिला हा नारा म्हणजे काँग्रेस पक्षाची देणगी आहे. ते काँग्रेसने काय दिले असे विचारतात? स्वदेशीचा नारा या देशात काँग्रेस पक्षानेच दिला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला. म्हणून तर देशात खादी आली, गांधी टोपी आली. एक दिवस नरेंद्र मोदी गांधी टोपी घालून भाषण करतील. मोदी आज काँग्रेसवाले झाले आहेत. नेहरूवादी आणि गांधीवादी झाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

ट्रम्प रोज बूच मारतोय, नाव का घेत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानला इशारा दिला असे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मोदी कोणाचेही नाव घेऊन कोणालाही इशारा देत नाही. तेवढी हिंमत त्यांच्यात नाही. ते कुणाचेही नाव घेत नाही. मराठीमध्ये गाणं आहे नाव घे ना पोरी लाजू नको, ते त्यांच्यासाठी आहे. अरे तुम्ही ट्रम्पचे नाव घ्या. देशाच्या शत्रूचे नाव घ्या. खुलेआम नाव घ्या. फक्त पंडित नेहरूंचे नाव का घेत आहात? ज्यांनी देश घडवला त्यांचेच नाव घेता. ट्रम्प तिकडे बसून बूच मारतोय. रोज देशाला शिव्या घालतोय. तुम्हाला पण शिव्या घालतोय, तुम्ही नाव घ्या ना. नाव घ्यायला लाजता आणि घाबरता कशाला? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पाकिस्तानच्या मागे उभे राहिले तर याद राखा

संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही नाव घेत आहोत ना. आम्ही अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या समोर जाऊन नाव घेऊ. पाकिस्तानला इशारा देणे खूप सोपे आहे. पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे हे मोदी कसे विसरतात? लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये. पाकिस्तानचा आर्मी चीफ मुनीर आम्हाला धमक्या देतो. मुनीरला ट्रम्पने एका टेबलावर व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बसवले. आमच्या आर्मीच्या चीफला बोलावले का? मोदींनी ट्रम्पला आव्हान दिले पाहिजे. पाकिस्तानच्या मागे चीन आहे. नुसता पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही तर चीनला दम दिला पाहिजे की, पाकिस्तानच्या मागे उभे राहिले तर याद राखा, असेही त्यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=nrrdkwcwmqu

आणखी वाचा

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: पहिली नोकरी मिळाल्यास 15 हजार देणार, जीएसटीही कमी करणार; लालकिल्ल्यावरील भाषणातील 10 मोठे मुद्दे

आणखी वाचा

Comments are closed.