CJP चे आंदोलन होऊ नये म्हणून सरकारकडून माध्यमं आणि तरुणांवर दबावतंत्र, संजय राऊत यांचा आरोप

“देशातील नीट (NEET) पेपरफुटीच्या महाघोटाळ्याचे केंद्रबिंदू हे महाराष्ट्रच आहे. लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणारा हा प्रकार केवळ शिक्षण खात्यापुरता मर्यादित नसून तो एक गंभीर गुन्हा आहे. म्हणूनच आधी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या दबावतंत्रावर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीविरोधात या देशात आंदोलनं यापूर्वी झालेली आहेत. लखनऊ, आसाम, दिल्ली… देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये पेपरफुटीविरोधात आंदोलनं झाली. आणि सरकारने ती दडपण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. त्यामुळे आता तरुण वर्ग संतप्त होऊन रस्त्यावर उतरलेला आहे आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतोय. यासंदर्भातल्या कोणत्याही बातम्या प्रसिद्ध होऊ नये याची तजवीज सरकारने केली. त्यासाठी माध्यमांवर दबाव आणलेले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत जंतरमंतरला येऊन पेपर फुटीच्या विषयावर आंदोलन करणार आहेत. त्यांचे आंदोलन यशस्वी झालं, या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. पण हे आंदोलन यशस्वी होऊ नये तरुणांनी तिथे पोहचू नये यासाठी सरकार दबावतंत्र अवलंबत आहे. जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. तरुणांनी आंदोलनाला पोहचू नये यासाठी पोलिसांना विषेश जबाबदारी देण्यात आली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

“… तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा अधिकार नाही”

संजय राऊत पुढे म्हणाले की, लाखो तरुण रस्त्यावर उतरणं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी या दोन्ही गोष्टींना मी यश मानतो. एकतर लाखो नसले तरी हजारो तरुणांनी आंदोलनात उतरणं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतकं मोठं स्कँडल होऊन हजारो तरुणांचं भविष्य त्यात फसलेलं आहे. तरीही नरेंद्र मोदी त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा कोणता अधिकार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

नीट पेपरफुटीप्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खरं तर यासंदर्भात राजीनामा देण्याची गरज गृहमंत्री अमित शहांना आहे, असे ते म्हणाले. हे पेपरफुटी प्रकरण जसं शिक्षण खात्याशी संबंधित आहे. तसे ते लॉ ऑर्डर, गुन्हा, गुन्हेगारीशी संबधित आहे. कारण शेवटी तुम्ही तपास सीबीआयकडे दिला आहे. कारण एक मोठा गुन्हा घडलेला आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांचा आयुष्य उद्धवस्त करणारा गुन्हा घडला असेल तर, देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. महाराष्ट हे त्या गुन्ह्याचं केंद्रबिंदू आहे. मग महाराष्ट्राचं गृहखात ज्यांच्याकडे आहे, त्याची ती जबाबदारी आहे की नाही? याचं उत्तर मिळायला पाहिजे, असे राऊत यांनी नमूद केले.

“तरुणांनी आंदोलनात उतरून देशाच्या लोकशाहीचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करावं”

‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत बोलताना राऊत म्हणाले की, हा एक अराजकीय आंदोलनाचा भाग आहे. अनेक सामाजिक संस्था किंवा अनेक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हे एकत्र जमतायत. या देशात लोकशाही असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष त्यांच्यामध्ये मत आणि मतांतर आहे आणि ज्या पद्धतीने राजकीय पक्षांवर सुद्धा सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. त्यातले काही राजकीय पक्ष त्याच्या आसपास फिरकणार नाही. पण आमच्यासारखे जे लोक आहेत ते तरुणांनी आंदोलनात उतरावं आणि देशाच्या लोकशाहीचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करावं या मताचे आम्ही आहोत, असे राऊत म्हणाले.

“महाराष्ट्र चळवळ आणि आंदोलनाला पाठिंबा देणारं राज्य”

जे निर्भय आहेत ते आज आंदोलनाला जातील. सर्वच पक्षात तरुणांचे नेतृत्व केलेले महाराष्ट्रात अनेक लोक आहेत. त्यांनी आपले पक्ष बाजूला ठेवून एक तरुण माणूस काय करतो आहे? कोणता आंदोलन करतोय? तो अटकेलाही घाबरत नाहीये. त्याच्यापासून काही प्रेरणा घेतली पाहिजे. महाराष्ट्र हा नेहमी चळवळ आणि आंदोलनाला पाठिंबा देणारं हे राज्य आहे. अनेक चळवळी आपण केलेल्या आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राकडून जास्त अपेक्षा आहे, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.

जंतरमंतरवर आज धडकणार कॉकरोचचे वादळ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज निदर्शने

Comments are closed.