देशात दोन जोकर आहेत आणि महाराष्ट्रात फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये जोकरांची फौजच आहे – संजय राऊत
दुष्काळाच्या अहवालाच्या ओझ्याखाली शेतकरी मरून जाईल, शेतकऱ्यांना आज मदत हवी आहे, तुम्ही आजचं बोला. असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच देशात दोन जोकर आहेत आणि महाराष्ट्रात फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये जोकरांची फौजच आहे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी देशाचे नेते आहे. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांना लोक मानसन्मान देतात. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला दिवे लावण्याचा कार्यक्रम झाला, तो कॉमेडियनचा वरचा प्रकार आहे. पंतप्रधान मोदी लोकसभेत आणि बाहेर ज्या पद्धतीने अनेक कॉमेडीचे प्रकार गेल्या काही काळापासून करत होते, मग ते पंडित नेहरु असतील, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबत कॉमेडी करत होते तो काय प्रकार होता? देशात दोन जोकर आहेत आणि महाराष्ट्रात फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये जोकरांची फौजच आहे, त्यावर बोललं तर बरं होईल, असे संजय राऊत म्हणाले.
देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशा प्रकारे मिमिक्री करणे योग्य आहे का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, या सगळ्यांची सुरुवात कोणी केली? पंडित नेहरु यांची खिल्ली कोण उडवत होतं? पंडित नेहरु, इंदिरा गांधी, सोनिया गांधी त्यांच्यावर अत्यंत वाईट शब्दांत टीका कोण करत होतं. राहुल गांधी विरोधात कॅम्पेन केलं गेलं तेच आता यांच्या विरोधात उलटलं. पंतप्रधानांवर टीका करायची नाही असं संविधानात लिहिलंय का? कोणत्याही देशाचा पंतप्रधान चुकत असेल तर त्यांच्यावर टीका होणारच. पंतप्रधान टीकेच्या चौकटी बाहेर नाहियेत. राष्ट्रपती सोडून सगळ्यांवर टीका करण्याचा अधिकार या जनतेला आहे. तुम्ही राजकारणी आहात, लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलेला आहात. तुम्ही जर चुकत असाल तर तुमच्यावर कठोर शब्दांत टीका केली जाईल, विरोधी पक्षनेत्याचे तेच काम आहे आणि महाराष्ट्रात आम्ही तेच काम करत आहोत, संजय राऊत यावेळी म्हणाले.
दुष्काळाबाबत सरकार पाहणी करणार, पंचनामे करतील, अहवाल सादर करतील. या अहवालाच्या ओझ्याखाली शेतकरी मरून जाईल. शेतकऱ्यांना आज मदत हवी आहे, तुम्ही आजचं बोला. अहवालासाठी तुम्हाल तिथे बसवलेलं नाहिये. आज सामनाच्या अग्रलेखात आम्ही सविस्तर लिहिले आहे की शेतकऱ्यांना काय हवं आहे, संजय राऊत म्हणाले.
दुष्काळाच्या बैठकीत मंत्री बदाम खात होते आणि अधिकारी सोशल मीडिया पाहत होते. यावर संजय राऊत म्हणाले की, हीच तर कॉमेडी आहे. फडणवीसांची दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर ही ब्लकॅ कॉमेडी आहे. शेतकरी मरतोय, विद्यार्थी आत्महत्या करतोय, गणपती मंडपात कधी नव्हे ते लोक मरायला लागले आहेत. फडणवीसांच्या राज्यात अक्षरशः विध्वंस ध्वंस सुरू आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
Comments are closed.