‘ऑल इज वेल’ म्हणत रँचो पुन्हा एकदा परतणार? ‘3 इडियट्स- 2’च्या शूटिंगची तारीख आली समोर
थ्री इडियटस् या चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एका अहवालानुसार, आमिर खान एप्रिल 2027 पासून या सिक्वेलच्या कामाला सुरुवात करू शकतो. विशेष म्हणजे, मूळ चित्रपटातील करीना कपूर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी हे कलाकारही पुन्हा या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.
सध्या आमिर खान आगामी ‘ललकारा’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त होणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर 2026 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. मार्च 2027 पर्यंत या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. ‘ललकारा’ हा चित्रपट हिंदुस्थानी क्रिकेटपटू लाला अमरनाथ आणि 1952 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेतील हिंदुस्थानी संघाच्या नेतृत्वाभोवती केंद्रित असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर 2027 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती आहे. 1952 च्या या कसोटी मालिकेला 2027 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत असल्याने त्याच कालावधीत चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन असल्याचे अहवालात म्हटले आहे असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
‘ललकारा’चे काम बहुतांश पूर्ण झाल्यानंतर आमिर खान राजकुमार हिरानी यांच्या ‘3 इडियट्स’ या चित्रपटाचे सिक्वेलकडे लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असून, आगामी वर्षाच्या सुरुवातीला पटकथा अंतिम स्वरुपात तयार होणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाला होकार देण्यापूर्वी आमिर स्वतः पटकथा वाचून त्यावर निर्णय घेणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2027 च्या आसपास तो पटकथा वाचू शकतो आणि सर्व काही नियोजनानुसार झाले, तर एप्रिलमध्ये चित्रपटाच्या कामाला सुरुवात होऊ शकते.
‘3 इडियट्स’च्या सिक्वेलमध्ये मूळ चित्रपटातील प्रमुख कलाकार पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. आमिर खानसोबत करीना कपूर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा दिसू शकतात.
Comments are closed.