संजय राऊत यांनी माफी मागितली आहे
सर्वोच्च न्यायालयाची अवमानना केल्याचे प्रकरण
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांची अवमानना केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी बिनशर्त क्षमायाचना केली आहे. आपल्या क्षमायाचनेचा स्वीकार करावा आणि आपल्या विरोधातील अवमानना प्रकरण मागे घ्यावे, असे राऊत यांनी त्यांच्या लेखी क्षमायाचनेत स्पष्ट केले आहे. एका प्रतिज्ञापत्राद्वारे संजय राऊत यांनी ही क्षमायाचना केली आहे. ही क्षमायाचना मी अत्यंत गांभीर्याने आणि प्रामाणिक भावनेने करीत आहे. माझ्या विधानांसंबंधी मला मनापासून खंत वाटत असून मी ही क्षमायाचना पूर्णांशाने, कोणत्याही समर्थनाखेरीज आणि बिनशर्तपणे करत आहे. मला सर्वोच्च न्यायालय, सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्था यांच्यासंबंधी नितांत आदर आहे. माझ्याकडून असे वक्तव्य पुन्हा होणार नाही, असा आशय असणारे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले आहे. सर्वोच्च न्यायालय यावर काय आदेश देणार याची उत्सुकता आहे.
प्रकरण काय आहे…
काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. सरन्यायाधीशांना ते एसआयआरसंबंधात निवेदन देणार होते. तथापि, सरन्यायाधीशांनी त्यांना भेट नाकारली होती. तुम्हाला ज्या समस्या असतील, त्या याचिकेच्या स्वरुपात सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करा. याचिकेवर विचार केला जाईल. पण व्यक्तीगत भेट घेणे अनुचित ठरेल, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले होते. सरन्यायाधीशांनी गांधी यांना भेट नाकारल्यामुळे संजय राऊत संतापले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश यांच्या विरोधात अभद्र भाषेत टिप्पणी केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात अवमानना अभियोग क्रियान्वित केलेला आहे. राऊत यांना सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित राहण्यासाठी नोटीस काढण्यात आली आहे.
अवमाननेचा नव्हता हेतू
मी केलेले विधान भावनेच्या भरात होते. न्यायालयाची किंवा सरन्यायाधीशांची अवमानना करण्याचा माझा हेतू नव्हता. ही क्षमायाचना मी पूर्णत: स्वेच्छेने करीत आहे. मी माझ्या विधानांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करु इच्छित नाही. यापुढे विधाने करताना मी अतिशय दक्षता घेईन आणि परिणामांचा विचार करुन विधाने करीन. न्यायव्यवस्थेसंबंधी विधाने करताना अतिशय सावधानता आणि सजगता दाखवावी लागते, हे मला मान्य आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही क्षमायाचना मान्य करुन माझ्याविरोधातील प्रकरण काढून घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
Comments are closed.