ममता बॅनर्जींचा पराभव नाही, तर केंद्राचा ‘लोकशाहीविरोधी’ कट; संजय राऊतांचा घणाघात
ममता बॅनर्जींवर संजय राऊत: पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांवर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली आहे. राऊत म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला नाही, तर त्यांचा पराभव करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व यंत्रणांचा गैरवापर केला. बंगालमध्ये मोदी आणि अमित शहा यांनी इराण-इस्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली होती. सैन्य, आर्थिक दहशतवाद आणि अफवांच्या जोरावर, तसेच मतदार यादीतून नावे वगळून ममता बॅनर्जींना रोखण्याचा प्रयत्न झाला. “त्यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा निवडणूक आयोग आणि सरकारच्या हुकूमशाही कृत्यांविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचाच एक भाग आहे,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
‘इंडिया’ आघाडी ममतांच्या पाठीशी
कालपर्यंत ममता बॅनर्जी ‘इंडिया’ आघाडीसोबत नसल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता संपूर्ण आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी आणि देशातील सर्व प्रमुख नेत्यांनी ममता बॅनर्जींना फोन करून पाठिंबा दर्शवला आहे. “आम्ही सर्वजण या लढाईत तुमच्या सोबत आहोत,” अशी ग्वाही या नेत्यांनी दिली आहे. ममता बॅनर्जी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपली ताकद देशाला दाखवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हुकूमशाहीविरोधात एकत्र येण्याचे आवाहन
देशातील लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राऊत यांनी केले. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा ‘गुलाम’ झाला असल्याचा आरोप करत त्यांनी आगामी काळात निवडणुका लढवायच्या की नाही, याचा विचार करावा लागेल असे म्हटले. विशेष म्हणजे, त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही साद घातली आहे. ज्याप्रमाणे आणीबाणीच्या काळात जगजीवन राम यांच्यासारखे नेते हुकूमशाहीविरुद्ध बाहेर पडले होते, तसेच आजही सत्ताधारी पक्षात काही लोक आहेत ज्यांना सध्याची परिस्थिती पटत नाही. अशा नेत्यांनाही ‘इंडिया’ आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले जाणार आहे.
नितीश कुमारांचे भाकीत ममतांनी आधीच केले होते
नितीश कुमार यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, ते पहिल्यापासूनच ‘भरकटलेले’ होते. पाटणा येथील पहिल्या बैठकीत जेव्हा नितीश कुमार यांना समन्वयक करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, “हे फार काळ थांबणार नाहीत, ते जाणार आहेत.” नितीश कुमार यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते कधीच एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने जर समन्वय साधला असता, तर निकालाचे चित्र अधिक वेगळे दिसले असते, असेही राऊत यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.