थकीत पैशांमुळे शेतकरी आर्थिक संकटात, कारवाई करा, न्याय मिळवून द्या! ‘अष्ट लक्ष्मी’ साखर कारखान्याप्रकरणी संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी थकबाकीचा गंभीर मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवले आहे. ‘अष्ट लक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेड’ या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना देयके न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पत्रानुसार, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या कारखान्याचे कामकाज सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला या कारखान्याचा ताबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडे होता. त्यानंतर हा कारखाना माजी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे देण्यात आला. पुढे त्यांनीही तो तिसऱ्या व्यक्तीकडे चालवण्यासाठी दिला. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, डिसेंबर 2025 पासून या कारखान्याकडे शेकडो शेतकऱ्यांनी उसाचा पुरवठा केला आहे. उस नियंत्रण कायद्यानुसार, उस तोडल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ‘फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस’ (FRP) नुसार पैसे देणे बंधनकारक असते. मात्र, साडेचार महिने उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी तीव्र आर्थिक अडचणीत आले असून कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.
पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, शेतकरी आधीच शेती खर्च, मजुरी, कर्जफेड यामुळे त्रस्त आहेत. त्यातच कारखान्याकडून देयके न मिळाल्याने त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांवर कर्जफेडीचा ताण असून काहींना शेती करणेही कठीण झाले आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे थकीत पैसे त्वरित मिळवून देण्यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
माननीय मुख्यमंत्री साहेब@Dev_Fadnavisहोय
आपण तातडीने लक्ष्य घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा!
@AmitShah pic.twitter.com/bAi2EHjeiZ— संजय राऊत (@rautsanjay61) 30 एप्रिल 2026
Comments are closed.