आरसीबीचे ‘एकच’ लक्ष्य, गुजरातसमोर घरच्या मैदानावर आरसीबीला रोखण्याचे आव्हान
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर रंगणारा सामना म्हणजे आता थेट लढाईच. दोघांनी आपल्या गेल्या सामन्यात जोरदार खेळ केलाय. आरसीबीने दिल्लीचा धुव्वा उडवला होता, तर गुजरातने चेन्नईची धुळधाण उडवलीय. त्यामुळे स्पर्धेचा अर्धा टप्पा पार झाल्यानंतर हे दोन्ही संघ आपली विजयाची मालिका सुरू ठेवण्यासाठीच मैदानात उतरणार आहेत. स्पर्धेच्या अर्ध्या टप्प्यावर गुजरातने अर्ध्याच लढती जिंकल्या आहेत, तर सहा विजयांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबी अव्वल स्थानावर झेप घेण्यासाठी उत्सुक आहे. परतीचा सामनाही जिंकून आरसीबी हे ध्येयही गाठेल, असा अंदाज आहे.
बंगळुरूच्या यशामागे वेगवान गोलंदाजांची भन्नाट कामगिरीच खरी ताकद ठरली आहे. भुवनेश्वर कुमार आपल्या स्विंगने फलंदाजांना गुंग करून सोडतोय, तर जोश हेझलवूड अचूक टप्पा आणि रेषेवर गोलंदाजी करत सतत दबाव निर्माण करतोय. मधल्या षटकांत कृणाल पंड्या आपल्या विविधतेने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकतोय. त्यामुळे आरसीबीच्या गोलंदाजीला तोड नाही. दुसऱ्या बाजूला गुजरातची फलंदाजी अजूनही वरच्या फळीभोवतीच फिरताना दिसतेय. शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर हे सातत्याने धावा करत असले तरी मधल्या फळीत अपेक्षित धार दिसलेली नाही. वॉशिंग्टन सुंदर काही प्रमाणात चमकला असला तरी शाहरुख खान आणि राहुल तेवतिया यांच्यासारख्या फिनिशर खेळाडूंना अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही.
Comments are closed.