पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : नगरपालिका निवडणुकानंतर आता महापालिका (Mahapalika election) निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसे पक्षाची युती होणार असून उद्याच जागावाटपही जाहीर होत असल्याने आता महापालिका निवडणुकांसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे पुण्यातही पवारांकडून रणनीती आखली जात असून दोन राष्ट्रवादी (राष्ट्रवादी) एकत्र येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत वेगळीच राजकीय समीकरणे पाहायला मिळतील. त्याच पार्श्वभूमीवर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. अजित पवारांना युतीत राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले.

अजित पवार यांचे नेते देवेंद्र फडणवीसअमित शाह आणि नरेंद्र मोदी आहेत. जर पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर महायुतीमध्ये अजित पवार यांना राहण्याचा अधिकार नाही, असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, पुण्यात जर दोन राष्ट्रवादी एकत्र असतील तर आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुण्यात जाणार नाही. मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेससुद्धा आमच्या सोबत पुण्यात येईल, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.

तर शरद पवारही उद्या पत्रकार परिषदेला येतील

मुंबईत ठाकरेंसोबत काँग्रेस येणार का या चर्चेला जवळपास पूर्णविराम लागला आहे. मात्र, मुंबई सोडून इतर काही ठिकाणी काँग्रेस सोबती असेल, तशी चर्चा आमची सुरू आहे, असेही राऊत यांनी सांगितले. तर, मुंबईसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा पूर्ण झाली तर शरद पवार यांना सुद्धा उद्या पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण दिलं जाईल, ते सध्या पुण्यात आहेत. शरद पवार जर पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले तर आम्हाला आवडेल, असेही राऊत यांनी म्हटले.

मुंबईत ठाकरे बंधूंना आव्हान

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जरी आले असले तरी ते महाविकास आघाडीमधून लढतील की नाही याची मात्र अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेसने या आधीच एकटे लढण्याची घोषणा केली असल्याने दलित आणि मुस्लिम मतांची बेगमी करण्याचं मोठं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे. तसेच मराठी बहुल परिसरातील सर्व मराठी मतं कशी पारड्यात टाकता येतील यासाठीही रणनीती आखावी लागणार आहे. उत्तर भारतीय मतदार हा भाजपच्या पाठीशी असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मराठी मतदार हा आपल्याकडे कसा वळला जाईल यासाठी ठाकरे बंधूंना प्रयत्न करावे लागणार आहेत.

हेही वाचा

अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी ‘हा’ धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

आणखी वाचा

Comments are closed.