मातोश्रीवरील बैठकीला सर्वच 9 खासदार हजर, पण…; बैठकीनंतर संजय राऊतांनी सांगितली ‘इनसाईड स्टोरी

मुंबई : पश्चिम बंगालमधील टीएमसी पक्षात उभी फूट पडली असून 20 खासदारांचा ग्रुपने स्वतंत्र गट स्थापन केले आहे. त्यातच, राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवर बैठक बोलावली असून या बैठकीला केवळ 4 खासदार प्रत्यक्षात उपस्थित होते. तर, 5 खासदारांची ऑनलाईन उपस्थिती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरुन, प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सर्वच खासदार बैठकीला उपस्थित असल्याचे म्हटले. शिवसेना उबाठा पक्षाचे सर्व नऊ खासदार बैठकीला होते. मातोश्रीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जी बैठक बोलवली होती, त्यामधे अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, संजय दीना पाटील, अरविंद सावंत स्वतः उपस्थित होते. तर, इतर सर्व खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच, जे खासदार ऑनलाईन उपस्थित होते, ते लवकरच मातोश्रीवर भेट घेतील, असेही ते म्हणाले.

मुंबईतील खासदार वगळता मराठवाडा आणि विदर्भातील खासदारांची अनुपस्थिती आजच्या बैठकीत दिसून आली. मात्र, त्यावर आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा विधानपरिषदेची निवडणूक लढतोय, त्यामुळे ते ऑनलाईन होते. तर, संजय जाधव – फोनवरून उपस्थित होते. यवतमाळचे खासदार संजय देशमुखांच्या घरीही मुलीचं लग्न आहे, त्यामुळे ते देखील ऑनलाईन उपस्थित होते. तर, भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार ओमराजे कौटुंबिक कारणास्तव (मेडिकल) बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. आम्ही दर महिन्याला रूटीन मिटिंग करत असतो, तेव्हा उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत असतात. परत पुढल्या महिन्यात अशी बैठक होईल. आजच्या बैठकीला जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत ते येत्या दोन-तीन दिवसांत स्वतः मातोश्रीवर  येतील, असेही राऊत यांनी सांगितले.

ऑपरेशन टायगरच्या चर्चेत तथ्य नाही – कैलास पाटील

ऑपरेशन टायगरच्या चर्चेत तथ्य वाटत नाही, लोकसभा निवडणुकीपासून कायम ही चर्चा होते. मुलाची तब्येत बरी नसल्याने खासदार ओमराजे निंबाळकर पक्षाच्या बैठकीला हजर नव्हते, त्यांनी तसं कळवलं ही होतं, असे म्हणत अंबादास दानवे यांच्या उपस्थितीतील बैठकीला देखील ओमराजे निंबाळकर अनुपस्थितीत होते, त्यावरुन गैरहजेरीवर आमदार कैलास पाटलांनी खुलासा केला आहे. तसेच, 2022 लाच आम्ही भूमिका ठरवली होती की, उद्धव ठाकरेंसोबत थांबायचं, असेही कैलास पाटलांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंच्या बैठकीला ओमराजे निंबाळकर गैरहजर, समोर आलं राज’कारण’; धोंडे जेवणामुळे बंडू जाधवही अनुपस्थित

Comments are closed.