ज्ञानेश कुमार देशाचा शत्रू! झुरळांचं आंदोलन यशस्वी होईल आणि ज्ञानेश कुमारला जावं लागेल- संजय राऊत

मुंबईतील शिवाजी पार्कवर ज्ञानेश कुमार विरोधात सीजेपी आंदोलन करत आहे. मात्र, या आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तुम्ही जनतेला कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी झुरळांचं आंदोलन यशस्वी होईल आणि ज्ञानेश कुमारला जावं लागेल. ज्ञानेश कुमार हा देशाचा शत्रू नंबर एक आहे. जरी तो फडणवीस, मिंधेंना प्रिय असला तरी तो देशाचा शत्रू असल्याची सडकून टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना शिवाजी पार्कवर होणाऱ्या आंदोलनात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. आणि माझी मुलगीही आंदोलनात उतरणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.  दिल्लीत जंतरमंतरला होणारं आंदोलन देखील कॉक्रोच जनता पार्टीचं आहे. त्यातही सगळे लोक सहभागी आहेत. मुंबईत मुख्य आंदोलन आहे. कालच अभिजीत दीपके यांना पकडलं, तरीही हजारोंच्या संख्येने तरुण मुलं जमणार आहेत. याचा अनुभव मी स्वत: माझ्या घरात घेतलाय. माझी मुलगीही आंदोलनात सहभागी झाली आहे. सिस्टिम विरोधात, लोकशाहीची हत्या करणाऱ्याविरोधात हा जो रोष पसरला आहे. आदित्य ठाकरेही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. माझ्या मुलीने सांगितले आम्ही निघालोय. बॅग भरलीय तिने अटक केली तरी हरकत नाही, जेल भरोला आम्ही तयार आहोत, असं ती म्हणाली. ही जी भावना तरुणांमध्ये उचंबळून आलीय ती तुम्हाला रोखता येणार नाही, असे इशारा संजय राऊत यांनी दिला.

आंदोलनाला परवानगी न देणे, हे लोकशाही विरोधी कृत्य

सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी न देणे, हे लोकशाही विरोधी कृत्य असल्याचे संजय राऊत म्हणाले. अभिजीत दीपकेने रस्त्यावर त्याच्या लग्नाची परवानगी मागितलेली नाही. मतदारांच्या हक्कासाठीची ही लढाई आहे. याचा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना इतका राग का यावा? दीपकेने या देशातील लोकशाहीचं रक्षण व्हाव, या देशातील मतदारांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून सीजेपीने आंदोलनाची परवानगी मागितली असेल तर स्वत: देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेऊन याला परवानगी द्यायला हवी होती. तर हे आणीबाणीच्या लढ्यातले खरे कार्यकर्ते आहेत हे आम्ही मानलं असतं, असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणजे न्यायालय नाही, न्यायालय म्हणजे जनता

आज झुरळांचा मोर्चा आहे आणि 4 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने मोठा मोर्चा होणार आहे. तुम्ही त्या आंदोलनाला परवानगी दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत पण सीजेपीला परवानगी का नाकारली? असा कोणता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला? पोलीस सतत दिपकेच्या मागे फिरतात. या महाराष्ट्रात हिटलरचं राज्य सुरू झालयं का? असा गंभीर सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ब्रिटिशांनी देखील अशा प्रकराच्या अटी घातल्या नव्हत्या. न्यायालये देखील आता गुलाम झालेले आहेत. पण हा लढा देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा आणि न्यायी हक्काच्या नागरिकांचा आहे. ही नागरिकांच्या हक्काची सनद आहे. हे न्यायालयाला कळायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस म्हणजे न्यायालय नाही, न्यायालय म्हणजे जनता आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.