मोदींच्या कॅबिनेटमध्ये एकही मर्द मंत्री नाही का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून संजय राऊतांचा घणाघात

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत लडाखचे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. या बेमुदत उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करतेय. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. सरकारला चुकीचं म्हणणारा एकही मर्द मंत्री मोदींच्या कॅबिनेटमध्ये नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निकालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. प्रत्येक नागरिकाचे आयुष्य मौल्यवान, असे म्हणत दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. यावर बोलताना, ‘न्यायालयाने आधी पंतप्रधानांना याप्रकरणी निर्देश द्यावेत. यासोबतच नीट पेपर लीक प्रकऱणात ज्या मंत्र्याची जबाबादारी आहे त्या मंत्र्याचा राजीनामा घेऊन, हे उपोषण सोडून टाकावे. सरकारने जर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले तर देशाचे चित्र बदलून जाईल’, असे संजय राऊत म्हणाले.

सरकारमधील सगळ्याच्या संवेदना मेलेल्या आहेत…

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला 20 दिवस पूर्ण होत आहेत. या आंदोलनात एक 20 वर्षीय तरूणी देखील सहभागी झाली आहे. तिची देखील प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या प्रकृतीबाबचे हे रिपोर्ट पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत का? या सगळ्याच्या संवेदना मेलेल्या आहेत. हे सगळे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत. तुम्ही जे काही करताय ते चूकीचे आहे, असे म्हणणारा मोदींच्या कॅबिनेटमध्ये एकही मंत्री नाही का? सोनम वांगचुक यांचा जीव वाचवणे या देशाचे कर्तव्य आहे. हे बोलणारा एकही मर्द मंत्री जन्माला आला नसेल तर मी भाजपला राष्ट्रभक्त किंवा शूर म्हणणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात…

दिल्लीतील राजकीय घडामोडींवर बोलताना राऊतांनी एक महत्त्वाचे विधान केले. जर केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल झाले, तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात. त्यांची सेवा केंद्र सरकार घेऊ शकते आणि महाराष्ट्रात भाजपचा एखादा वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा व्हावी यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. खरगेंच्या या भूमिकेशी आम्ही सहमत असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. खरगेंनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटल की, हा मुद्दा देशासाठी देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचा आहे. या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक झालीच पाहिजे. आम्ही खरगेंच्या पत्राशी सहमत आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

निवडणूक काळात चीनने त्यांच्या देशातील 20 कोटी नागरिकांचा डेटा चोरला, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ट्रम्प यांनी हा आरोप हिंदुस्थानी निवडणूक पद्धतीत झालेल्या घोटाळ्याचा अभ्यास करूनच केला असावा. हिंदुस्तानातही असाच घोटाळा झाला आहे. इथे डेटा चोरलाय, मतदार चोरलेत आणि मतेही चोरलेली आहेत. ट्रम्प यांनी जर हिंदुस्थानात झालेल्या निवडणूक घोटाळ्यांचा अभ्यास केला, तर त्यांना मोदी काय चीज आहे हे नक्की कळेल’,  असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Comments are closed.