Delimitation – कितीही तोडफोड केली तरी हे विधेयक पडणार! – संजय राऊत
संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम आणि मतदारसंघ पुनर्रचना असे दोन विधेयक सादर करण्यात आली आहेत. त्यावर गुरुवारपासून जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी ही विधेयके मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोधकांचा पूर्ण विरोध आहे. त्यामुळेच ‘हे विधेयक मंजूर होत नाही. हे विधेयक पडणार आहे’, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ‘दोन तृतियांश बहुमत म्हणजे 362 खासदारांचे बळ भाजपने कितीही तोडफोड केली तरी निर्माण करू शकत नाही’.
ममता बॅनर्जींशी बोलणं झालं…
या विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधकांनी एकजूट कायम ठेवली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असून खासदारांचे प्रचारदौरे सुरू आहेत त्यामुळे तृणमूलचे खासदार मतदानावेळी सभागृहात उपस्थित असणार का? असा प्रश्न चर्चिला जात आहे. त्यासंदर्भात बोलताना ‘तृणमुल काँग्रेसचे खासदार हे आता कोलकात्याहून निघाले आहेत आणि ते दिल्लीत पोहोचतील’, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणं झालं आहे आणि आम्ही सर्वांनीच विनंती केलेली आहे. शेवटी दिल्लीतले वातावरण पाहता ममता बॅनर्जी त्यांच्या पक्षातले खासदार दिल्लीला मतदानासाठी पाठवत आहेत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
विरोधकांच्या वॉक आऊटवरून विचारले असता राऊत म्हणाले की, ‘मला असे वाटत नाही. आता या क्षणी 10 वाजता विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे बैठक आहे. त्या बैठकीत पुढील दिशा ठरेल’.
…तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकते!
महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी उत्तर दिले. ‘विरोधी पक्षाचा एकच उमेदवार विधानपरिषदेवर जाईल. माझ्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. आता महाविकास आघाडीकडून खासकरून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची यासंदर्भात महाराष्ट्रात बसून एक दोन दिवसात निर्णय घेऊ’, असं संजय राऊत म्हणाले.
जे विधेयकाला विरोध करणार त्यांना राजकीय नुकसान झेलावे लागेल, असे पंतप्रधान मोदी गुरुवारी सभागृहात म्हणाले होते. यावर बोलताना ‘धमक्या देऊ नका. भाजपमध्ये हिंमत असेल तर निवडणुकीपूर्वी महिलांना योजना देतात, जसे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना, त्या आधी बंद करा मग तुम्हाला कळेल महिलांचे तुम्हाला आरक्षणानंतरही किती वोट मिळतात. सरकारच्या पैशांवर निवडणुकीआधी महिलांना योजनेद्वारे पैसे देतात, ते बंद करुन दाखवा मग तुम्हाला कळेल महिला तुमच्यासोबत किती आहेत. हा सर्व पैशांचा खेळ चालला आहे. लाडकी बहिण योजना, बिहारच्या महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये त्यामुळे तुम्हाला महिलांचे वोट मिळतात. तुम्ही हे बंद करण्याची हिंमत दाखवा. मग तुम्हाला सत्य कळेल, असं संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.