सरकारला मनोज जरांगे पाटील यांना मारायचं आहे, संजय राऊत यांचा घणाघात
राहुल नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायद्यावर बोलू नये, तो त्या कायद्याचा अपमान होईल, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच सरकारला जरांगे पाटील यांना मारायचं आहे. मनोज जरांगे पाटील यांची लढाई ही सरकारसाठी गळ्याचा फास बनलेला आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
हिंदुच्या सणांत मुस्लिमांनीही यायला हरकत नाही अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली आहे. संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे टोळभैरव आहेत, त्यांचं काऊन्सिलिंग झाले पाहिजे. देश घडवण्यात सर्व जाती धर्मांचे योगदान आहे. स्वातंत्र्य लढा असो किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल यामध्ये मुस्लिम समाजाचे योगदान मोठे आहे. पण अलीकडे काही बोगस हिंदुत्ववादी निघाले आहेत आणि काही देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी त्यांचे काऊन्सलिंग करायला पाहिजे. याबाबत अमृता फडणवीस यांची भूमिका योग्य आहे. नवरात्रीचा सण जेवढा धार्मिक आहे तेवढात सार्वजनिक आहे. आणि यात सगळे सामील होणार असतील तर त्या उत्सवाचे महत्त्व वाढतं. अशा भिंती बांधून हिंदुत्वाला रोखता येत नाही. हिंदुत्व हे सर्वसमावेशक आणि सर्वव्यापक आहे असेही संजय राऊत म्हणाले. जर पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन मशिदींना भेट देतात, तिथल्या इस्लामिक नेत्यांच्या गळाभेटी घेतात, सौदीच्या राजाला माझा भाऊ म्हणतात. इथेही मुस्लिम लोक आमचे बांधव आहेत, त्यांनी आमच्या उत्सवात येण्यात मनाई करता कामा नये. तिथे भाऊ आणि इथे शत्रू असं नाही चालणार, असेही संजय राऊत म्हणाले.
राहुल नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायद्यावर बोलू नये तो त्या कायद्याचा अपमान होईल. नार्वेकरांनी ज्या प्रकारचा निकाल शिवसेनेबाबत दिला आहे, त्यावरून नार्वेकरांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक कारागृहात भेट घेतली आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मदत करू असे आश्वासन दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, प्यारे खान यांची नेमणूक ही देवेंद्र फडणवीस सरकारने केली आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष किंवा त्यांच्याच पक्षातले चिल्ले पिल्ले आहेत त्यांना याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. जेव्हा नवरात्रीत मुस्लिमांना येऊ देणार नाही अशी भुमिका घेता तर मग तुम्हीच नेमलेल्या अल्पसंख्यांचा प्रमुख मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपीला ज्याने हिंदुंना मारलं असं आपण म्हणतो त्यालाच जाऊन भेटतो आणि त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा करण्यासंदर्भात चर्चा करतो यावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांची भूमिका येणे गरजेचे आहे, असेह संजय राऊत म्हणाले.
सरकारला जरांगे पाटील यांना मारायचं आहे. मनोज जरांगे पाटील यांची लढाई ही सरकारसाठी गळ्याचा फास बनलेला आहे. जरांगे पाटलांचा उपयोग सरकारसाठी संपलेला आहे. सरकारने निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा वापर करून घेतला आणि आता जरांगे पाटलांना वाऱ्यावर सोडले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे, आणि त्यांची आज प्रकृती खालावल्याचं पाहिलं. हे अत्यंत अमानुष आहे, सरकारच्या कुणीतरी प्रमुख माणसाने जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन चर्चा केली पाहिजे. मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो, देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यातील सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
Comments are closed.