आरोपींचं आदल्यादिवशी हॉटेलवर जेवण, संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला? सर्वात मोठा खुलासा
संतोष देशमुख प्रकरण बीड : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात येत आहे. अशातच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आता आणखी एक नवी माहिती पुढे आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी घटनेतील आरोपींनी बीड-अंबाजोगाई (Beed Ambajogai) महामार्गावरील तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं तपासात समोर आले आहे. त्यामुळे याच हॉटेलवर देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याची संशय व्यक्त करत पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी, तपास यंत्रणेने हॉटेल मालकाची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे.
हत्येच्या आदल्या दिवशी आरोपींचे तिरंगा हॉटेलवर जेवण
सरपंच देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. हत्येच्या आदल्या दिवशी आठ डिसेंबर रोजी घटनेतील आरोपींनी याच तिरंगा हॉटेलवर जेवण केले होते. त्यानंतर आरोपी केजच्या दिशेने रवाना झाले. या प्रकरणात तपास यंत्रणेकडून प्रत्येक गोष्टीची तपासणी आणि चौकशी सुरू आहे. अशातच आरोपींची ही माहिती मिळाल्यानंतर सीआयडी आणि एसआयटीच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य केल्याचे हॉटेल मालका बाबुराव शेळके यांनी सांगितले आहे.
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सीआयडीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले होते. तर या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात (Kej Court) सुनावणी पार पडली असून वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर येत्या 20 तारखेला सुनावणी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाकडे 22 तारखेला पुढील सुनावणी व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयानं सुनावणीसाठी 20 तारीख दिली आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.