महिला डॉक्टरनं आयुष्य संपवलं, हातावर सुसाईड नोट; म्हणाली, माझ्यावर PI बदनेने चारवेळा अत्याचार क
सातारा गुन्हे: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकाराने फलटण तसेच संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिली होती. या मजकुरात त्यांनी नमूद केले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला.” या धक्कादायक खुलाशानंतर पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
Satara Crime: काही महिन्यांपासून चालू होता वाद आणि चौकशीचा दबाव
दरम्यान, महिला डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन.” तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.
Satara Crime: महिला डॉक्टरचे टोकाचे पाऊल
अखेर काल (गुरुवारी) रात्री महिला डॉक्टरने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या हातावर आढळलेल्या लिखाणामुळे आत्महत्येचे प्रकरण आता गुन्हेगारी चौकशीच्या टप्प्यावर गेले आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Shambhuraj Desai Reaction: कठोर कारवाई केली जाईल : शंभूराज देसाई
याबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मला आत्तापर्यंत या घटनेचे अधिकृत कारण अधिकाऱ्यांकडून स्पष्ट झालेले नाही. मी एसपींशी बोललो आहे की, तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जा. तेथे सुसाईड नोट वगैरे काही आढळली असेल तर ते अत्यंत खेदजनक आहे. या प्रकरणात खोलवर तपास करू. या प्रकरणातील सर्व पुरावे गोळे करू. मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्यांची देखील माहिती घेऊ. या घटनेत जो कोणी दोषी असेल तरी त्याला सोडले जाणार नाही. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे: फाशीची शिक्षा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. जे कोणी हे कृती कृत्य केलेले आहे त्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
Sushma Andhare: बहिणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा वाऱ्यावर सोडला : सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, ही खरंच अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. एकीकडे लाडक्या बहिणी सारख्या योजना शासन राबवत आहे> मात्र त्याच वेळेला बहिणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा वाऱ्यावर सोडला जातो. एका अत्यंत सुशिक्षित डॉक्टरचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत व्हावा, ही इथल्या समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारी बाब आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याचे खाते आहे. मात्र त्याच खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी जर अशा पद्धतीने पिळवणुकीच्या व्यवस्थेचे वाहक होणार असतील तर निश्चितपणे कुंपणच शेत खात आहे, असे म्हणण्याची स्थिती आली आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.