‘दादा फक्त मामे भाऊ नव्हता, तर तो…’ विधिज्ञ शिंदे यांच्या निधनानंतर सत्यजित तांबे यांची पोस्ट

सत्यजीत तांबे फेसबुक पोस्ट: सुप्रीम कोर्टात वकिली करणारे ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सिद्धार्थ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असताना अचानक भोवळ आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सिद्धार्थ शिंदे हे माजी कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे हे नातू होते. दरम्यान, सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. विधानपरिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी फेसबुक पोस्ट करत भावनांना वाट करुन दिली.

सत्यजित तांबे म्हणाले, माझा मामेभाऊ व सुप्रीम कोर्टातील यशस्वी, अभ्यासू विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाच्या बातमीने मी सुन्न झालो आहे. सिद्धार्थ दादा माझ्यासाठी फक्त भाऊ नव्हता, तर तो एक जिवलग मित्रही होता. पहिली दिल्ली वारी मला त्यानेच 25 वर्षांपूर्वी करून दिली होती. आयुष्यातील पहिला परदेश प्रवास, सिंगापूरला, तो तेथे शिक्षण घेत असताना त्यानेच मला सोबत नेले होते. तो अत्यंत हुशार, अभ्यासू आणि प्रेमळ माणूस होता. त्यांचे आजोबा, डॉ. आण्णासाहेब शिंदे हे देशाचे 16 वर्षे कृषी व अन्नमंत्री होते. देशातील हरितक्रांती तसेच धवलक्रांती (दुग्धव्यवसाय) घडवून आणण्याचे श्रेय त्यांना जाते. सिद्धार्थ दादाच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबावर, शिंदे परिवारावर, त्याचे मामा दौंडच्या जगदाळे परीवारावर, त्याची बहीण दिलेल्या आर्वी (वर्धा) येथील खा. अमर काळे परीवारावर तसेच त्यांची सासुरवाडी सासवडच्या जगताप परिवारावर, जगभर पसरलेल्या सिध्दार्थदादाच्या मित्र परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, माझे मार्गदर्शक स्व. डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे नातू सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील ॲड. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुखद आहे. कायद्यावरील त्यांचे गहन ज्ञान आणि सखोल अभ्यास प्रत्येक चर्चेतून दिसून येत असे. महाराष्ट्रातील कायदेशीर मुद्द्यांवर त्यांनी केलेली मांडणी स्पष्ट, प्रबोधनात्मक आणि लोकाभिमुख होती. आज न्यायक्षेत्रातील एक तडफदार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

शरद पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील, ॲड. सिद्धार्थ शिंदे ह्यांच्या अकाली निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. न्यायक्षेत्रातील प्रामाणिक योगदानाची, न्यायासाठी असलेल्या समर्पित भावनेची आणि आपल्या सर्वांचं नीतिमत्तेला धरून कायद्याचं, कायदेशीर बाबींचं सोप्या शब्दात केलेलं प्रबोधन कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि विधीवृंदाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या आयुष्यातही गुंडगिरी करायचा तेजाब सिनेमातील ‘लोटिया पठाण’, एका मुलाखतीने आयुष्य बदललं अन् बनला बॉलिवूडचा व्हिलन!

आणखी वाचा

Comments are closed.