हिंदुस्थानी नागरीकांना घेऊन जाणाऱ्या जहाजावर सौदी अरेबियाचा हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लाल समुद्रातील झुकर बेटाजवळ हिंदुस्थानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बोटीवर सौदी अरेबियाने हल्ला केल्याचा दावा येमेनमधील हुथी बंडखोरांनी केला आहे. या बोटीत 14 हिंदुस्थानी नागरिक होते, असे त्यांनी म्हटले आहे. येमेनच्या सशस्त्र दलांनी या हिंदुस्थानी नागरिकांची सुटका केल्याचा दावाही हुथींनी केला आहे. मात्र, या घटनेबाबत स्वतंत्र पुष्टी अद्याप स्पष्ट झालेली नाही.

लाल समुद्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, झुकर बेटाजवळ हिंदुस्थानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या एका बोटीला लक्ष्य करण्यात आल्याचे हुथी बंडखोरांनी म्हटले आहे. ‘सौदी शत्रू’ने या बोटीवर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सीजीटीएन युरोपच्या वृत्ताचा हवाला देत हुथींनी दिलेल्या निवेदनात, बोटीत 14 हिंदुस्थानी नागरिक असल्याचे सांगण्यात आले. येमेनच्या सशस्त्र दलांनी या नागरिकांना वाचवले असून, घटनेबाबत अधिक माहिती नंतर दिली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. या आरोपांबाबत सौदी अरेबियाची अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्वतंत्र पुष्टी या वृत्तात देण्यात आलेली नाही.

हुथींनी या कथित हल्ल्यामुळे लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीला धोका निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे. या परिसरातील सागरी मार्ग हा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जहाजांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान, सौदी अरेबियातील दमाम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. तसेच, सौदी अरामकोच्या पूर्वेकडील प्रांतातील शायबाह तेलक्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात आणखी एक भारतीय नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या घटनांनंतर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबियातील नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. २१ ऑक्टोबर रोजी दमाम विमानतळ आणि शायबाह तेलक्षेत्राला लक्ष्य करण्यात आल्याचा उल्लेख मंत्रालयाने आपल्या निवेदनात केला. या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचेही मंत्रालयाने म्हटले. येमेनच्या संरक्षण मंत्रालयाने हुथी बंडखोरांच्या समर्थनार्थ त्यांच्या नियंत्रणाखालील भागांत होणाऱ्या सभांबाबत इशारा दिल्याचे वृत्त आहे. अशा सभांना वैध लष्करी लक्ष्य मानले जाऊ शकते, असा इशारा देण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.