SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं मोठी झेप घेतली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं  बाजारमूल्याच्या निकषावर टीसीएसला पिछाडीवर टाकलं आहे. बाजारमूल्य या निकषावर देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.  एसबीआयचं बाजारमूल्य आज सकाळी 11.55 वाजता 10.78 लाख कोटींवर पोहोचलं होतं. तर, टीसीएसचं बाजारमूल्य 10.68 लाख कोटी आहे. यापूर्वी एसबीआयनं आयसीआयसीआय बँकेला देखील पिछाडीवर टाकलं आहे. सध्या बाजारमूल्याच्या निकषावर रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर, एचडीएफसी बँक दुसऱ्या स्थानावर तर भारती एअरटेल तिसऱ्या स्थानावर आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी म्हणजे आज इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये शेअर 3 टक्क्यांनी वाढून 1174.80 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसात शेअर 10 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका महिन्याचा विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांची तेजी आली आहे. दुसरीकडे या कालावधीत सेन्सेक्स 0.5 टक्क्यांनी वाढला आहे. तर, टीसीएसच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये देखील घसरण झाली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर मधील तेजीचं कारण डिसेंबर तिमाहीतील चांगली कामगिरी आहे. या तिमाहीत बँकेला आतापर्यंतचा सर्वाधिक नफा मिळाला आहे. बँकेनं या तिमाहीत 21028 कोटींचा नफा मिळवला आहे.   गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत  24.5 टक्के वाढ नफ्यात झाली आहे. बँकेला निव्वळ व्याजातून मिळणारं उत्पन्न देखील 9 टक्क्यांनी वाढून 45190 कोटी झालं आहे. नेट इंटरेस्ट मार्जिन 2.99 टक्के राहिलं आहे. यामुळं गुंतवणूकदारांचा बँकेवरील विश्वास वाढला आहे.

आरबीआयच्या नव्या नियमांमुळे स्टेट बँकेला REITs आणि विलिनीकरण आणि अधिग्रहण या सारख्या क्षेत्रात नव्या संधी मिळतील. स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्जाची वाढ 13 ते 15 टक्के अंदाजित केली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये मार्जिन जवळपास 3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विविध ब्रोकरेज फर्मनं देखील एसबीआयच्या कामगिरीचं कौतूक केलं आहे. Axis Securities नं मोठ्या बँकामध्ये सर्वात चांगली कामगिरी स्टेट बँक ऑफ इंडियाची असल्याचं म्हटलं. बँकेची असेट क्वालिटी चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं. या फर्मनं एसबीआयच्या शेअरला बाय रेटिंग दिलं असून टारगेट प्राईस 1280 रुपये ठेवली आहे. तर JM फायनान्शिअलनं देखील एसबीआयच्या शेअरला BUY रेटिंग देत  टारगेट प्राईस वाढवून 1250 केलं आहे. जाणकारांच्या मते एसबीआयची कमाई येत्या वर्षांमध्ये चांगली राहील.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.