शालेय राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रीय अजिंक्यपदाचे स्वप्न आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची ध्येयाने प्रेरित झालेले राज्यातील 387 युवा बुद्धिबळपटू  शुक्रवारपासून बुद्धिबळाच्या पटावर एकमेकांना कडवे आव्हान देणार आहेत. एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱया टप्प्याला शुक्रवारपासून दहिसर येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरुवात होत आहे.

इंडियन चेस स्कूल आयोजित या तीन दिवसीय स्पर्धेत 9, 13 आणि 17 वर्षांखालील मुले व मुली अशा सहा फिडे मानांकित गटांत डाव रंगणार आहेत. प्रत्येक गटातील पहिले दोन खेळाडू अहमदाबाद येथे 16 ते 20 डिसेंबरदरम्यान होणाऱया राष्ट्रीय शालेय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने प्रत्येक डावाला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे

या टप्प्यात नऊ वर्षांखालील खुल्या गटात 110, मुलींच्या गटात 56, 13 वर्षांखालील खुल्या गटात 123, मुलींच्या गटात 45, 17 वर्षांखालील खुल्या गटात 38, तर मुलींच्या गटात 15 खेळाडू उतरतील. पहिल्या टप्प्यातील 417 खेळाडूंसह दोन्ही टप्प्यांतील एकूण सहभाग 804 वर पोहोचला आहे.

लहान गटात अध्वान ओसवाल आणि गार्गी हरकरे यांना अग्रमानांकन मिळाले आहे. 13 वर्षांखालील गटात निर्वाण शाह आणि त्वेषा जैन, तर 17 वर्षांखालील गटात आर्य बागायतकर आणि दृष्या नाईक यांच्यावर विशेष लक्ष असेल. सात फेऱयांच्या या स्पर्धेसाठी 60 हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

Comments are closed.