चौथ्या वन डेत टीम इंडियाचा मेकओव्हर; गिल-राहुल बाहेर, अय्यरच्या खांद्यावर नेतृत्वाचा भार

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे क्रिकेट मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलेल्या टीम इंडियामध्ये चौथ्या सामन्यापूर्वीच मोठे बदल झालेले आहेत. टीम इंडियाचा मेकओव्हर झाला असून त्यांनी आपला थेट कर्णधारच बदलला आहे. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी शुभमन गिल, के. एल. राहुल आणि अंशुल पंबोज यांना वन डे संघातून माघार घ्यावी लागणार आहे. तिसरा सामना पावसात वाहून गेल्यामुळे चौथ्या वन डेत हिंदुस्थानी संघाची संपूर्ण रचनाच बदलण्याची शक्यता आहे. उर्वरित दोन सामन्यांत नेतृत्वाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. दुसरीकडे न्यूझीलंडला मालिका वाचवण्याची अखेरची संधी असणार आहे.

टीम इंडियाने मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखले असले तरी प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापनाला नव्याने समीकरणे जुळवावी लागणार आहेत. अय्यरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने यापूर्वी टी-20 मालिकेतही बाजी मारली होती. आता वन डे मालिकेतही विजयाची परंपरा कायम राखण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

राहुलच्या जागी ईशानला संधी

के. एल. राहुल कसोटी संघासोबत जोडला जाणार असल्याने यष्टिरक्षणाची जबाबदारी ईशान किशनकडे येण्याची शक्यता आहे. राहुलने मालिकेमध्ये फलंदाजीत छाप पाडली होती. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्याचे आव्हान ईशानसमोर असेल. न्यूझीलंडच्या परिस्थितीत फलंदाजांची कसोटी लागत असताना ईशानला मिळणाऱया संधीचे सोने करावे लागणार आहे.

रोहितचा सलामीचा साथीदार कोण

शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात कोण करणार, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. यासाठी ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड हे दोन पर्याय संघ व्यवस्थापनासमोर आहेत. ईशानकडे यष्टिरक्षणासह सलामीचीही जबाबदारी सोपवता येऊ शकते. पण ऋतुराजलाही सलामीला उतरवण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे अय्यर कोणावर विश्वास टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिराजचे पुनरागमन शक्य

अंशुल पंबोजने आतापर्यंतच्या मालिकेत प्रभावी गोलंदाजी केली आहे, मात्र कसोटी संघात त्याचा समावेश झाल्याने तो उर्वरित वन डे सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी अनुभवी मोहम्मद सिराजला अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. या दौऱयात अद्याप एकही सामना न खेळलेल्या सिराजला आता आपली छाप पाडण्याची संधी मिळू शकते.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ ः रोहित शर्मा, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्ंधर), इशान किशन (यष्टिरक्षक), नमन धीर, अक्षर पटेल, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडचा संभाव्य संघ ः फिन अॅलन, टिम सायफर्ट (यष्टिरक्षक), विल यंग, निक केली, मिच हे, मायकल ब्रेसवेल, मिचेल सॅण्टनर (कर्णधार), डीन फॉक्सक्रॉफ्ट, काईल जेमिसन, मॅट फिशर/ख्रिस्टियन क्लार्क/मॅट हेन्री, जेकब डफी.

Comments are closed.