जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये आता पीएच.डी. अभ्यासक्रम
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, आर्किटेक्चर अॅण्ड डिझाइन डिनोव्हो विद्यापीठात प्रथमच पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत संशोधनासाठी कला, वास्तुकला व रचना या तीन विषयांमध्ये एकूण 16 जागांना मंजुरी देण्यात आली आहे. डिसेंबरपासून या जागांसाठी प्रवेश परीक्षेस सुरुवात होणार आहे.
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने 29 ऑक्टोबरच्या बैठकीत पीएच.डी. प्रवेश नियमांना मंजुरी दिली. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या प्रवेश व संशोधन मार्गदर्शन संबंधित नियमांचा अवलंब करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी उपलब्ध जागांपैकी निम्म्याच जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून संशोधक विद्यार्थ्यांना पुरेसे मार्गदर्शन व संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर असल्याचे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. भविष्यात अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक शिक्षकवर्ग व संशोधन मार्गदर्शकांची संख्या वाढविण्याचे नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तीन विषयांसाठी 88 अर्ज
पीएच.डी.च्या 16 जागांमध्ये कला विषयासाठी सहा, रचना विषयासाठी सहा, तर वास्तुकला विषयासाठी चार जागा आहेत. या 16 जागांसाठी कला विषयासाठी 43, रचना विषयासाठी 37 व वास्तुकलेसाठी आठ असे एकूण 88 अर्ज आले आहेत. प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना किमान तीन वर्षे संशोधन पूर्ण करण्यासाठी द्यावी लागणार आहेत.
Comments are closed.