जागतिक स्थिरतेसाठी SCO चे योगदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बैठकीचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक स्थैर्य आणि शांततेत शांघाय सहकार्य परिषद (एससीओ) अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारू शकते, असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या हस्ते शुक्रवारी या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. दिल्लीत ही परिषद तीन दिवस चालणार आहे. या परिषदेतील सदस्य देशांचे एकमेकांमध्ये दाट सांस्कृतिक आणि नागरी संबंध आहेत. या संबंधांचा उपयोग या परिषदेचे जागतिक महत्त्व वाढण्यासाठी होऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. ही परिषद संघटनेच्या देशांमध्ये परस्पर सांस्कृतिक सहकार्य दृढ करण्यासाठी आहे.
सांस्कृतिक संबंधांमुळे जगाची शांतता सुनिश्चित केली जाऊ शकते. असे संबंध ही जागतिक शांततेची सर्वात बळकट हमी आहे. साम्राज्ये जगाचा नकाशा परावर्तीत करतात, तर सांस्कृतिक संबंध विचारसरणीमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणतात. भारताने नेहमीच अन्य देशांशी सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. अशा संबंधांमधून स्थिरशांतीकडे वाटचाल करणे सुलभ होईल, अशी भारताची भूमिका आहे. आमच्या प्राचीन शास्त्रानुसार आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाला प्रमाण मानून आमची वाटचाल चालविली आहे. सारे जग हे एक कुटुंब आहे, यावर आमचा दृढ विश्वास आहे. भारत हा प्राचीन काळापासूनच शांतताप्रिय देश राहिला आहे, अशी मांडणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणात केली.
एआय तंत्रज्ञान महत्त्वाचे
जगाचा ऐतिहासिक वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. तसेच ऐतिहासिक कागदपत्रांचे भाषांतर एआयच्या माध्यमातून करुन हा महत्त्वाचा ठेवा सुरक्षित केला पाहिजे. तसेच जगापर्यंत पोहचविला पाहिजे. एससीओ देशांनी या संदर्भात एकमेकांमध्ये सहकार्य करुन पुढाकार घ्यावा, अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी त्यांच्या भाषणात केली आहे.
इतिहासासंबंधी संशोधन व्हावे
भारतातील सिंधू-सरस्वती संस्कृती, गंधार संस्कृती, मध्य आशियातील विविध संस्कृती आणि मेसापोटेमिया संस्कृती यांचे प्राचीन काळी एकमेकांमध्ये घनिष्ट संबंध होते. या इतिहासाचे अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. हे संशोधन या सर्व संस्कृतींचा वारसा मानणाऱ्या देशांकडून संयुक्तरित्या होणे आवश्यक आहे. यातून वर्तमान काळासाठीही बरेच काही शिकता येईल. शांघाय सहकार्य परिषदेच्या 25 वर्षांच्या काळात या परिषदेने सुरक्षा, आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक आदान-प्रदान या क्षेत्रांमध्ये मोठे कार्य केले आहे. हे कार्य भविष्यकाळात अधिक वेगाने पुढे नेण्यात आले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
Comments are closed.