IRE vs AFG: सेदिकुल्लाह अटलने मोडला सचिन तेंडुलकरचा अनोखा रेकॉर्ड! वाढदिवलाच रचला मोठा विक्रम

आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील चौथा सामना बुधवारी (12 ऑगस्ट) बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबवर खेळला गेला, ज्यामध्ये अफगाणिस्तानच्या दोन फलंदाजांनी आणि आयर्लंडच्या एका फलंदाजाने शतकी खेळी केली. अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झाद्रान आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सेदिकुल्लाह अटल यांनी शतकी खेळी केल्या. यामुळे अफगाणिस्तानने 50 षटकांत 9 विकेट्स गमावत 343 धावसंख्या उभारली.
सेदिकुल्लाहने 120 चेंडूंत 17 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 143 धावा केल्या. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले असून त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्याही ठरली आहे. तसेच त्याने झादरानसोबत दुसऱ्या विकेटसाठी 231 धावांची भागीदारी केली.
वाढदिवशी सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या
सेदिकुल्लाहने शतकाबरोबरच एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. तो वाढदिवशी सर्वोच्च एकदिवसीय धावा करणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने न्यूझीलंडच्या टॉम लॅथमला मागे टाकले आहे.
लॅथमने 2 एप्रिल 2022 रोजी, आपल्या 30 व्या वाढदिवशी नेदरलॅंड्सविरुद्ध नाबाद 140 धावा केल्या होत्या. दिग्गज सचिन तेंडुलकर यानेही 24 एप्रिल 1988 रोजी, आपल्या 25 व्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावा केल्या होत्या. आता सेदिकुल्लाहने आयर्लंडविरुद्ध 143 धावांची खेळी करताना या दोघांना मागे टाकले आहे. (Sediqullah Atal surpasses Sachin Tendulkar; scores a century on his birthday IRE vs AFG 4th ODI)
सामन्याची स्थिती
लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 48 षटकांतच 301 धावसंख्येवर सर्वबाद झाला. यामुळे अफगाणिस्तानने हा सामना 42 धावांनी जिंकला आणि सलामीवीर ऍंड्र्यू बालबर्नीचे शतक वाया गेले. त्याने 109 धावा केल्या होत्या.
या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर उर्वरित तिन्ही सामने अफगाणिस्तानने जिंकले. यामुळे पाच सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तान 3-0 असा विजयी आघाडीवर आहे.
सहाव्या स्थानी फलंदाजीसाठी आलेल्या कर्टिस कॅम्फरने 46 चेंडूंत 84 धावा करत सामन्याचा रोमांच वाढवला, मात्र हा सामना अफगाणिस्तानने 42 धावांनी जिंकला. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स यामिन अहमदजाईने घेतल्या. त्याने 10 षटकांत 71 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच अटल सामनावीर ठरला. यावरून त्याच्यासाठी हा सामना खासच ठरल्याचे दिसते.
Comments are closed.