‘कर्णधार हार्दिक’ गुजरात टायटन्सला नकोसा
हार्दिक पंडय़ाने अखेर मुंबई इंडियन्सला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे आता समोर येत आहे; कारण हार्दिक आता अन्य संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. हार्दिकने आपला जुना संघ असलेल्या गुजरात टायटन्सला गळ घातल्याचे समोर आले आहे. हार्दिकने गुजरातच्या संघाला आपल्याला पुन्हा एकदा कर्णधारपद द्यावे, अशी मागणी केली होती. पण गुजरातच्या संघाचे हार्दिकची ही मागणी धुडकावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गुजरातलाही हार्दिक आता नकोसा असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरू झाली आहे.
हार्दिकने गुजरातला त्यांच्या पदार्पणाच्या हंगामात (2022) विजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे गुजरातचे नेतृत्व पुन्हा मिळवण्याचा त्याचा आग्रह होता. गुजरातचा संघ आपल्याला पुन्हा नेतृत्व करण्याची संधी देईल असे त्याला वाटले होते; पण त्याचा आग्रह हा या करारातील सर्वात मोठा अडथळा ठरला. फ्रँचायझीने याला सहमती दर्शवली नाही.
याबाबत सूत्रांनी सांगितले की, ‘गुजरातची फ्रँचायझी त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी तयार होती. त्यांनी या संदर्भात सध्याचा कर्णधार शुभमन गिलशीही चर्चा केली होती आणि तोही हार्दिकला परत घेण्यास सहमत झाला होता. पण जेव्हा हार्दिकने पुन्हा कर्णधारपद सोपवण्याची अट घातली, तेव्हा फ्रँचायझी आणि संघ व्यवस्थापनातील सर्वांनी स्पष्टपणे नकार दिला.’
मुंबई इंडियन्ससाठी अयशस्वी हंगाम
आयपीएल 2026चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक ठरला. संघाने 14 पैकी केवळ चार सामने जिंकले आणि गुणतालिकेत 9 व्या स्थानावर राहिला. 2024 मध्ये रोहित शर्माच्या जागी कर्णधार झाल्यापासून हार्दिकचे चाहत्यांशी असलेले संबंध बिघडले आहेत. मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापनही त्याच्या कामगिरीवर आणि कर्णधारपदावर नाराज असून पुढील हंगामासाठी त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा विचार करत आहे.
हार्दिकची अजून काही संघांशी बोलणी सुरू
गुजरातव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जसारख्या मोठय़ा संघांनीही हार्दिक पंडय़ाबाबत मुंबई इंडियन्सशी संपर्प साधला आहे; पण या सर्व वृत्तांमध्ये हार्दिकच्या प्रवक्त्याने थेट बोलणी झाल्याच्या वृत्तांना फेटाळून लावले आहे. फ्रँचायझींविषयी प्रवक्त्याने स्पष्ट केले, ‘हार्दिक पंडय़ाच्या हस्तांतरण किंवा ट्रेडबाबत कोणत्याही फ्रँचायझीसोबत थेट चर्चा झालेली नाही. जर असा कोणताही पुढाकार घेण्यात आला असेल तर तो थेट मुंबई इंडियन्स फ्रँचायझीमार्फत घेण्यात आला आहे.’
Comments are closed.