इंडिगो फ्लाइटमध्ये इंजिनमध्ये बिघाड; 224 प्रवासी सुखरूप.
चेन्नई : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री उशिरा फूल इमर्जन्सी घोषित करण्यात आली. कोलकात्याहून येणाऱ्या इंडिगोचे एक विमान विमानतळावर पोहोचण्यापूर्वी त्याच्या इंजिनात बिघाड झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. परंतु बिघाडानंतरही विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरले आहे. या घटनेत विमानातील सर्व 224 प्रवासी अन् चालक दलाचे सर्व सदस्य सुखरुप आहेत.
इंडिगोचे विमान 6ई-723 रात्री सुमारे 11.30 वाजता विमानतळानजीक पोहोचत असताना वैमानिकांना एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळले, यात इंधनगळतीचा प्रकारही सामील होता. वैमानिकांनी त्वरित एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली, ज्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी पूर्ण इमर्जन्सी प्रोटोकॉल लागू केले होते. खबरदारीदाखल विमानतळाच्या धावपट्टीनजीक अग्निशमन वाहने, बचाव पथके अन् वैद्यकीय पथकांना तैनात करण्यात आले होते. परंतु इंजिन बिघाडानंतरही वैमानिकाने रात्री उशिरा विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरविले.
Comments are closed.