ओविंद यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत बुधवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक : माय लाईफ, माय स्ट्रगल्स’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला. नवी दिल्लीमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याची छायाचित्रे पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ या आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहेत. तसेच ‘माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याचा भाग बनताना मला आनंद झाला. हे पुस्तक भारतीय लोकशाहीची खरी ताकद आणि त्यातील शक्यतांचे प्रतिबिंब दर्शवते,’ असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक : माय लाईफ, माय स्ट्रगल्स’ या पुस्तकातील मुख्य संकल्पनेवर भर देत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित पेले. या पुस्तकात कोविंद यांचा प्रेरणादायी संघर्ष, विविध भूमिकांमधून त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि जनसेवेप्रती असलेली त्यांची दृढ निष्ठा उत्कृष्टपणे अधोरेखित केल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक भारतीयासाठी ते प्रेरणास्थान असून यातून देशाच्या लोकशाहीची खरी ताकद प्रतिबिंबित होते, असे पंतप्रधान म्हणाले.

‘माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुस्तक वाचनीय असून प्रेरणादायी आहे, त्यात त्यांनी केलेला संघर्ष, सेवा आणि खासदार, राज्यपाल आणि देशाचे राष्ट्रपती म्हणून दिलेले मोलाचे योगदान उत्कृष्टपणे अधोरेखित केले आहे. रामनाथ कोविंद यांनी आपल्या आयुष्यासाठी जनसेवेचा मार्ग निवडला आणि ते सदैव आपल्या कर्तव्याप्रती पूर्णपणे समर्पित राहिले. त्यांची निष्ठा आणि सेवाभाव प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Comments are closed.