IREvsAFG: विराट-धवनच्या पुढे निघाला अफगाणी ओपनर! शतकासह पीटरसनच्या खास क्लबमध्ये दिमाखदार एंट्री

आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील चौथा सामना बुधवारी (12 ऑगस्ट) बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लबमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झादरान आणि सेदिकुल्लाह अटल यांनी शतकी खेळी केल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. त्याचबरोबर झाद्रानने एका विशेष यादीत स्थान मिळवले.

झाद्रानने 118 चेंडूंमध्ये 107 धावा केल्या. त्याचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. या शतकाबरोबरच त्याने 2000 एकदिवसीय धावाही पूर्ण केल्या. त्याने आपल्या 45 व्या एकदिवसीय डावामध्ये ही कामगिरी केली आणि खास यादीत प्रवेश केला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 2000 धावा पूर्ण करणाऱ्या यादीत झाद्रान संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. यामुळे त्याने झहीर अब्बास, केविस पीटरसन, बाबर आझम, आणि रस्सी वॅन दर दुसेन यांची बरोबरी केली आहे. या यादीत भारतीय कर्णधार शुभमन गिल पहिल्या स्थानी आहे. त्याने 38 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. 40 डावांसह दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला दुसऱ्या स्थानी आहे.

भारताचे दिग्गज विराट कोहलीने 53 आणि शिखर धवनने 48 डावांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारे खेळाडू (डावानुसार)
शुभमन गिल (भारत) – ३८ dv
हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) – 40 डाव
झहीर अब्बास (पाकिस्तान) – 45 डाव
केविस पीटरसन (इंग्लंड) – 45 डाव
बाबर आझम (पाकिस्तान) – 45 डाव
रस्सी वॅन डर दुसेन (दक्षिण आफ्रिका) – 45 डाव
इब्राहिम झाद्रान (अफगाणिस्तान) – 45 डाव

दोन शतकांमुळे अफगाणिस्तानने 50 षटकांत 9 विकेट्स गमावत 343 धावसंख्या उभारली. अटल आणि झाद्रान यांनी जबरदस्त खेळी करताना दुसऱ्या विकेटसाठी 231 धावांची भागीदारी केली. अटल 120 चेंडूंत 143 धावा करत बाद झाला.

लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडनेही चांगली सुरूवात केली. त्यांचा सलामीवीर ऍंड्र्यू बालबर्नीने 109 धावा केल्या. त्याला रशीद खानने बाद केले. सहाव्या स्थानी फलंदाजीसाठी आलेल्या कर्टिस कॅम्फरने 46 चेंडूंत 84 धावा करत सामन्याचा रोमांच वाढवला, मात्र हा सामना अफगाणिस्तानने 42 धावांनी जिंकला. सर्वाधिक विकेट्स यामिन अहमदजाईने घेतल्या. त्याने 10 षटकांत 71 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर उर्वरित तिन्ही सामने अफगाणिस्तानने जिंकले. यामुळे पाच सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तान 3-0 असा विजयी आघाडीवर आहे. तसेच या मालिकेतील दुसऱ्या विजयानंतर अफगाणिस्तान आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 साठी थेट पात्र ठरला आहे. (IRE vs AFG: इब्राहिम झद्रानने विराट कोहलीला मागे टाकले आणि शिखर धवन 2000 वनडे धावा पूर्ण करणारा संयुक्त तिसरा सर्वात वेगवान फलंदाज ठरला)

Comments are closed.