मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो पाहून माजी खेळाडूंची हार्दिक पांड्यावर टीका, म्हणाले….
मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मजबूत संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. पण त्यानंतर मुंबईला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मुंबईचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. पण हा संघ कागदावरच मजबूत असल्याचं दिसून आलं आहे. कारण मैदानावर या संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. २०२४ मध्ये झालेल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. पण त्यावेळी मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी राहिला होता. यावेळीही अशीच काहीशी चिन्ह आहेत. मुंबईचा संघ यावेळीही सर्वात शेवटी राहू शकतो. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या कामगिरीसह नेतृत्वावरही जोरदार टीका केली जात आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ २ सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवता आला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सचा हा फ्लॉप शो पाहता, न्यूझीलंडने माजी खेळाडू आणि समालोचक सायमन डूल यांनी हार्दिक पंड्यावर जोरदार टीका करत त्याला रिलीज करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, जर मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलला तर गोष्टीही बदलू शकतात.
सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने २४३ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादने १९ व्या षटकात विजय मिळवला. या सामन्यानंतर क्रिकबझवर बोलताना सायमन डूल म्हणाले, “माझा प्रश्न हा आहे की, पुढच्या वर्षी कर्णधार कोण असेल? जर ते बदल करण्याच्या विचारात असतील तर त्यांचा कर्णधार कोण असेल? जर हार्दिक पंड्या नसेल, तर त्याला रिलीज करा.”
ते पुढे म्हणाले की, “हार्दिक पंड्याला रिलीज करा. गेली ३ वर्ष तो संघाचा कर्णधार होता, त्याचा संघ हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यानंतर त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेणार. मला माहीत नाही अशा वातावरणात तो कशी कामगिरी करणार. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत हार्दिकला जुळवून घेता आले नाही.”
Comments are closed.