टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी
IND-W वि AUS-W मुंबई: महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतानं उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताचा उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत सामना आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसलाय. वर्ल्ड कपमध्ये फॉर्ममध्ये असलेली भारताची सलामीवीर प्रतिका रावल बांगलादेश विरुद्धच्या मॅचमध्ये दुखापतग्रस्त झाली. त्यामुळं तिला स्पर्धेबाहेर जावं लागलं आहे. अखेर आयसीसीनं प्रतिका रावलच्या जागी भारताची आक्रमक फलंदाज शफाली वर्माला संघात स्थान देण्यास मान्यता दिली आहे. शफाली वर्माला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत संघात स्थान मिळू शकतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया 30 ऑक्टोबरला नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम येथे आमने सामने येतील.
शफाली वर्मानं शेवटचा वनडे सामना जुलै 2024 म्हणजेच जवळपास सव्वा वर्षापूर्वी खेळला आहे. तिनं भारतासाठी 29 वनडे, 5 कसोटी आणि 90 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
आयसीसीनं सोमवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. त्यानुसार बांग्लादेश विरूद्धच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण करताना प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्यानं तिच्या जागी शफाली वर्माला संघात स्थान दिल्याची माहिती दिली. प्रतिकाला मैदानाबाहेर नेण्यासाठी स्ट्रेचर आणावं मात्र ती सहयोगी स्टाफसह चालत मैदानाबाहेर गेली. प्रतिका रावल वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार फॉर्ममध्ये होती. तिनं 51.33 च्या सरासरीनं 308 धावा केल्या होत्या.
प्रतिका रावल हिनं न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपमधील पहिलं शतक झळकावलंहोतं. वनडेमध्ये संयुक्तरित्या वेगवान 1000 धावा करणारी खेळाडू ठरली होती. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना हिनं चांगली कामगिरी करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली होती.
शफाली वर्मानं 29 मॅचमध्ये 23 च्या सरासरीनं 644 धावा केल्या आहेत. कामगिरीत सातत्य नसल्यानं शफाली वर्माला वनडे संघातील स्थान गमवावं लागलं होतं. मात्र ती टी 20 संघात खेळते. ऋचा घोषच्या फिटनेसवर देखील प्रश्नचिन्ह आहे. ती बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात खेळली नव्हती.
शफाली वर्मानं वर्ल्ड कपपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना 49 बॉलमध्ये 70 धावा केल्या होत्या. शफाली वर्मा टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे.
आणखी वाचा
Comments are closed.