चाचणी – संवेदनशील लेखन

>> सुधाकर वसईकर

व्यवहारात यशस्वी होत जाणाऱया माणसाचे कुतूहल, निरागसता आणि दुसऱयाचे दुःख जाणवण्याची क्षमता टिकून राहते का? डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ या ललित लेखसंग्रहाच्या केंद्रस्थानी हा प्रश्न आहे. संगीत, साहित्य, बालपण, कुटुंब आणि सार्वजनिक जीवनातील अनुभवांतून लेखक या प्रश्नांची वेगवेगळी रूपे उलगडतात. उपरोधाने हसवणारे प्रसंग आणि मनाला अस्वस्थ करणाऱया आठवणी यांची सांगड घालत हे पुस्तक वाचकाला स्वतच्या वागण्याकडे पाहायला लावते. सहा गटांत विभागलेल्या तीस लेखांमध्ये आत्मपर चिंतन, व्यक्तिचित्रण, संवादप्रधान प्रसंग आणि रूपककथा असे विविध प्रकार येतात. चौकट मोडणाऱया किंवा मोडू पाहणाऱया ‘वेडय़ां’ना केलेले अर्पण लेखकाची भूमिका स्पष्ट करते. समाजाच्या मान्यतेसाठी स्वतचे वेगळेपण पुसून टाकण्याविषयी त्याला आक्षेप आहे. त्यामुळे शीर्षकातील ‘शहाणपणा’ला उपरोधाची छटा लाभते. प्रतिष्ठा, पैसा आणि योग्य ठिकाणी योग्य वागण्याची कला मिळवताना संवेदनांची होणारी हानी या लेखांना एकत्र बांधते.

संग्रहाला नाव देणारा ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ हा लेख या भूमिकेचे सर्वांत ठळक उदाहरण आहे. अंधारातील सावल्या पाहण्यात रमणारा, चिखलात खेळू इच्छिणारा आणि जग्गूच्या मैत्रीत आनंद मानणारा पंपू मोठय़ांच्या अपेक्षांनुसार बदलत जातो. त्याच्या प्रश्नांना मिळणारी पुढे ढकललेली उत्तरे, श्रीमंतीवरून माणसांची होणारी विभागणी आणि संस्कारांच्या नावाखाली बसवले जाणारे साचे यांतून त्याचे स्वतंत्र अनुभवविश्व आक्रसते. पुढे तोच आपल्या मुलाला अशाच प्रकारे घडवू लागतो. या चक्राकार रचनेमुळे ‘फॅक्टरी’ हे रूपक परिणामकारक ठरते. मुलाचे संगोपन करताना त्याला ऐकून घेण्याची जागा किती ठेवली जाते, हा प्रश्न लेख नेमकेपणाने उपस्थित करतो.

‘मित्र’मधील संवेदनशील माणसाला सभोवतालची माणसे सतत बदलायला सांगतात. निसर्गात रमणे, चांगल्या भाषेचा आग्रह धरणे आणि कलेतील उथळपणावर हरकत घेणे हे त्याचे गुणच इतरांच्या दृष्टीने अडचण बनतात. या चित्रणातून गर्दीशी जुळवून घेण्यासाठी व्यक्तीला मोजावी लागणारी भावनिक किंमत जाणवते. ‘मग जगायचं कधी?’मध्ये हाच विचार स्वतला सिद्ध करण्याच्या धडपडीपर्यंत पोहोचतो. समाजमाध्यमे आणि प्रसिद्धीचे व्यवहार यांवरील लेखांत कुलकर्णींच्या उपरोधाला विशेष धार येते. ‘किंग ऑफ डरकाळी’मध्ये बोक्याभोवती निर्माण केलेली प्रतिमा, तिची जाहिरात आणि गर्दीने तिला दिलेली मान्यता यांतून गुणवत्तेची जागा प्रसिद्धी कशी घेते, हे दाखवले आहे. प्राण्यांच्या रूपकामुळे हा व्यवहार सहज समजतो आणि त्यातील विसंगती अधिक उठून दिसते. ‘भावगंगा – द सफारी’मध्ये भावसंगीताच्या अभ्यासपूर्ण कार्यक्रमाची कल्पना प्रायोजकांच्या अपेक्षा आणि भडक सादरीकरण यांत कशी बदलत जाते, याचे विनोदी चित्रण आहे. दोन्ही लेखांमधील अतिशयोक्ती करमणूक करते. त्याच वेळी कलेच्या आशयापेक्षा तिचे प्रदर्शन महत्त्वाचे ठरण्याची खंतही व्यक्त करते.

लेखकाचा विनोद केवळ इतरांना लक्ष्य करत नाही. ‘शकू मेली’मध्ये स्वतच्या कलाकारप्रतिमेबद्दलची जाणीव आणि गैरसमजातून वाढणारी धांदल यांची तो खिल्ली उडवतो. ‘ठरलं… की नाही ठरलं?’मध्ये अनोळखी तरुण-तरुणीच्या संभाषणाबद्दल वाटणारे कुतूहल कबूल करताना स्वतच्या भोचकपणाचीही जाणीव ठेवतो. अशा जागांमुळे लेखक आणि वाचक यांच्यात जवळीक निर्माण होते.

संगीत आणि कविता यांविषयीचे लेख पुस्तकाला वेगळे भावनिक परिमाण देतात. ‘हृदयी नटावला ब्रह्माकारे!’मध्ये पं. हृदयनाथ मंगेशकरांविषयीची आत्मीयता, तर ‘सुखानेही असा जीव कासावीस’मध्ये लता मंगेशकरांच्या गायनातून मिळणारा उत्कट आनंद व्यक्त झाला आहे. ‘शब्द एकेक असा येतो की!’ आणि ‘उदासीत या कोणता रंग आहे?’ यांसारख्या लेखांत कवितेच्या ओळी वैयक्तिक अनुभव समजून घेण्याचे माध्यम बनतात. बोरकर, शांताबाई शेळके, ग्रेस, कुसुमाग्रज आणि संदीप खरे यांच्या शब्दांशी लेखकाचे असलेले नाते वाचकाला जाणवते. या संदर्भांमुळे परिचित कवितेकडे पुन्हा लक्ष देण्याची इच्छा निर्माण होते.

‘पाखरू’ हा लेख विशेष लक्षात राहतो. घरात पंख्याला धडकून पडलेल्या पाखरामुळे अस्वस्थ झालेला लेखक स्वतलाच विचारतो की, दूर घडणाऱया दुर्घटनेपेक्षा आपल्या घरात घडलेल्या प्रसंगाचा अधिक त्रास का होतो, या आत्मपरीक्षणामुळे संवेदनशीलतेचा आग्रह अधिक प्रामाणिक वाटतो. दुसऱयांना हळवे होण्यास सांगताना स्वतच्या सहवेदनेच्याही मर्यादा तपासण्याची तयारी येथे दिसते. उत्तरार्धातील ‘थोडं समजून घ्याल ना?’ आणि ‘आजीची गोष्ट’ हे लेख नात्यांमधील अंतराची वेदना प्रभावीपणे मांडतात. पहिल्या लेखातील वृद्ध वडिलांचे पत्र आणि स्मृती क्षीण होत चाललेल्या पत्नीचे अनुभव वृद्धत्वातील असहायता जाणवून देतात.

कुलकर्णींच्या लेखनाची महत्त्वाची ताकद त्यांच्या बोलक्या भाषेत आहे. थेट प्रश्न, छोटे संवाद, रोजच्या बोलण्यातले इंग्रजी शब्द आणि प्रसंगाच्या शेवटी येणारे अनपेक्षित वळण यांमुळे लेखांना गती मिळते. वाचताना प्रत्येकाला आपापल्या अनुभवांच्या जागा सापडतील. ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ वाचल्यानंतर आपल्या आसपासच्या एखाद्या माणसाचे बोलणे अधिक लक्षपूर्वक ऐकावेसे वाटणे किंवा स्वतच्या एखाद्या सहज आनंदाला पुन्हा वेळ द्यावासा वाटणे, हा या लेखनाचा अर्थपूर्ण परिणाम ठरू शकतो.

शहाण्या माणसांची फॅक्टरी

लेखक: डॉ. सलील कुलकर्णी

प्रकाशक: साकेत प्रकाशन प्रा.लि.

पृष्ठेs ः १९२

किमंत ः 299

Comments are closed.