आता, आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावं लागेल; विधानपरिषदेवरुन शंभूराज देसाईंचा इशारा

सातारा: राज्यातील विधान परिषद (विधान परिषद) निवडणुकीत यंदा राज्याचं लक्ष लागलंय ते नाशिक आणि सांगली-सातारा मतदारसंघातील लढतीकडे. कारण, येथील सातारा-सांगली मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवारीला अदृश्य बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, अद्यापही शिवसेनेकडून भाजप उमेदवाराला समर्थन देण्याचा निर्णय झाला नाही. तर, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवेळी झालेला राडा शिवसेना नेते विसरलेले नाहीत. त्यातच, शंभूराज देसाईंकडून (Shambhujraj desai) सातत्याने नाराजी उघड केली जात आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तुम्ही प्रतिसाद दिला का? आता आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, अशा शब्दात शंभूराज देसाईंनी भाजपला इशारा दिलाय.

सातारा-सांगली विधानपरिषदेत भाजपने धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या समन्वय बैठकीला मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित नव्हते याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूकीवेळी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही येत नाही आणि समन्वय बैठकीच्या वेळीच भाजप स्वबळावर लढेल हे तुम्ही जाहीर करता. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हालाही विचार करावा लागणार ना? असे म्हणत शंभुराज देसाईंनी आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच, आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार, असा इशराही शंभूराज देसाईंनी दिला. त्यामुळे, येथील विधानपरिषद निवडणुकीवरुन भाजप महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं चित्र पुन्हा एकदा उघड झालं आहे.

शिवसेना सदस्यांची बैठक होईल – देसाई

सातारासांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने त्यांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती या सर्व सदस्यांना एकत्र पर्यटनासाठी नेण्याची योजना आखली आहे. मात्र, मी त्याची माहिती घेतली नाही, आमची कोअर कमिटीची बैठक काल झाली. त्याप्रमाणे उद्या आमच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली, या बैठकीत जे होईल ते वरिष्ठांना सांगितलं जाईल आणि त्यानंतर मुंबईत वरिष्ठ निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाईंनी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मांडली. दरम्यान, शिवसेना सदस्यांचा मत काय आहे हे समजून घेतलं तरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढचे धोरण ठरेल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

हेही वाचा

एकनाथ शिंदेंचं नाव नसल्याने गणेश नाईकांची गाडी अडवली, नवी मुंबईत राडा, मंदा म्हात्रे म्हणाल्या, मी सुद्धा वैतागले, पुढचं पाऊल उचलणार!

Comments are closed.