पंतप्रधानांच्या घोषणांनी देशात अस्वस्थता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, प्रतिक्रिया देत म्हणा
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये बोलताना देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत ऊर्जा बचत ही केवळ पर्यावरणाशी संबंधित बाब नसून देशाच्या आर्थिक स्थैर्याशी थेट जोडलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर शक्य असेल तेथे कंपन्या आणि संस्थांनी ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) किंवा ‘हायब्रिड वर्क मॉडेल’चा (Hybrid Work Policy) विचार करावा, असेही मोदी यांनी सुचवले.कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर वापरात आलेल्या वर्क फ्रॉम होम पद्धतीमुळे इंधनाची बचत, वाहतूक कोंडीमध्ये घट आणि प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत झाली होती. आता पुन्हा एकदा इंधन बचतीसाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असे सरकारचे मत आहे. त्याचबरोबर सोन्याची खरेदी टाळा, परदेश प्रवास टाळा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, नैसर्गिक शेतीचा अवलंब करा अशी काही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली, यावरती विरोधकांनी मोदींवर सडकून टीका केली, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Sharad Pawar Post: काय म्हणालेत शरद पवार?
शरद पवारांनी त्यांच्या सोशल मिडीयावरून याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, “मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे.”
मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक,…
— शरद पवार (@PawarSpeaks) १२ मे २०२६
“सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
Narendra Modi On Gold Petrol Diesel : नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली?
सोन्याची खरेदी टाळा
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
परदेश प्रवास टाळा
खाद्यतेलाचा वापर कमी करा
नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
स्वदेशी उत्पादनं वापरा
पीएम मोदी : नरेंद्र मोदींच्या आवाहनामागील मोठी कारणं
एकंदरीत पाहता, या सर्व घटकांमुळे सरकारवर आपला डॉलर साठा जपून ठेवण्याचा दबाव वाढला आहे. याचे कारण असे की, जेव्हा जेव्हा भारत वस्तूंची आयात करतो, उदा. तेल, वायू (गॅस), सोने किंवा खते तेव्हा त्याचे पेमेंट (पैसे) डॉलरमध्ये केले जाते. परिणामी, जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात, तेव्हा अधिक प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो आणि रुपयाची स्थिती कमकुवत होते. नेमक्या याच कारणामुळे सरकार जनतेला अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन करत आहे. जसे की सोन्याची खरेदी करणे, इंधनाचा अतिवापर करणे किंवा परदेश प्रवास करणे. अशा उपाययोजनांमुळे डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मदत मिळेल. पंतप्रधानांचे हे आवाहन एक ‘सावधगिरीचा उपाय’ म्हणून पाहिले जात आहे; जागतिक संकटाच्या काळात भारताच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या मोठ्या आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Strait of Hormuz : होर्मुझमधील सामुद्रधुनीवरील तणाव कायम
मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्धविराम असला तरीही होर्मुझमधील सामुद्रधुनीवरील तणाव कायम आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 3.30 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यामुळे कच्च्या तेलाचा दर 104 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे. तसंच अमेरिकेतही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ दिसून आली असून तिथे जवळपास 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत कच्च्या तेलाचा दर 98 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहोचला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.