नेहरूंचं कर्तृत्व, त्यांचं योगदान याची तुलना होऊ शकत नाही; नेहरूंशी मोदींची तुलना करणाऱ्या नेत्यांचा शरद पवारांनी घेतला समाचार

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावरून भाजप नेत्यांकडून तुलना सुरू आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. नेहरूंचं कर्तृत्व, त्यांचं योगदान याची तुलना होऊ शकत नाही, असे म्हणत शरद पवारांनी नेहरूंशी मोदींची तुलना करणाऱ्या नेत्यांवर तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, देशासमोर शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला अत्याचार, आदिवासी, अल्पसंख्याक असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. पण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना या प्रश्ना संबंधी किती आस्था आहे यावर भाष्य न केलेले बरे. गेले काही दिवस काही लोक एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहे की, देशात या कर्तुत्वाचा एकही नेता होऊन गेला नाही. त्यांची तुलना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत केली जात आहे. पण नेहरूंचे कर्तृत्व, त्यांचे योगदान याची तुलना होऊ शकत नाही.

पंतप्रधान व्हायच्या आधी देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यात नेहरूंनी अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. पंडित नेहरू हे मोठ्या घरातले, सुविद्य, स्वातंत्र्यायी होते. स्वातंत्र्याआधी ते अनेकवर्ष तुरुंगात राहिले. गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी संघर्ष केला आणि शेवटची तुम्हाला, मला स्वतंत्र हिंदुस्थानचे नागरिक ही उपाधी मिळवून देण्यासंदर्भात मोलाची कामगिरी केली, त्या नेत्यांमध्ये नेहरूंचा समावेश होतो हे आपण विसरू शकत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

कुणी किती काळ पंतप्रधान राहिले यावरून त्यांची तुलना नेहरूंसोबत होऊ शकते का? नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान पद हे संसदीय पद्धतीतील संस्थात्मक पद आहे आणि त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणे हे भारतीयांचे काम आहे. आम्ही टिका, टिप्पणी करू. पण धोरणात्मक पदाची प्रतिष्ठा आम्ही ठेवत असतो, त्याचा अनादर आम्ही कधी होऊ देत नाही, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’बाबत केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक गृहस्थ शीख समाजाच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथे केलेल्या भाषणात त्यांनी इंदिरा गांधींवर टीका केली. इंदिरा गांधी देशाच्या स्वातंत्र्यानंतरही संघर्ष करत राहिल्या. जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवायला अतिशय मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. त्यांनी नेहमी देशाची प्रतिष्ठा जपली. त्या संदर्भात कधीही तडजोड केली नाही, असे शरद पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी रशियाची राजधानी मॉस्कोत घडलेल्या प्रसंगाचाही दाखला दिला. मॉस्कोत इंदिरा गांधी यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान आले नाही. तेव्हा 40 कोटी लोकांची प्रतिष्ठा जपण्यासाठी इंदिरा गांधी यांनी रशियाच्या पंतप्रधानांचीही भेट टाळली होती, अशी आठवण पवारांनी सांगितली.

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा काळा दिवस, गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने वाद; इंदिरा गांधी आणि लष्करावरही टीका केल्याने देशभरात संताप

Comments are closed.