शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?

मुंबई : राज्यसभेची (Rajyasabha) निवडणूक जाहीर झाली असून याच महिन्यातील 16 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुतीकडे 6 आणि महाविकास आघाडीकडे 1 जागा आहे. त्यामध्ये, भाजपला 4 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळणार आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना उमेदवारांची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष आग्रही असल्याचे पाहायला मिळालं. त्यात, संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना आणि काँग्रेसच जास्त आग्रही होती. मात्र, महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये एक मत होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील दोन आठवड्यापासून  महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एका जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातच, आता शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये एकमत होताना पाहायला मिळत आहे. राज्यसभेसाठी शरद पवारांनी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केल्याने या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंसह दिल्लीमधील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. जर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देत असतील तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचं नाव राज्यसभेचे उमेदवार म्हणून निश्चित होत असल्याचे समजते.

भाजपकडून कोणाची नावे जाहीर होणार?

राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असून सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार निश्चित करत आहेत. भाजपकडून आजच 6 राज्यातील 9 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रातील उमदेवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान, मविआकडून तिन्ही पक्षांमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू असताना शरद पवारांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे, शरद पवार पुन्हा दिल्लीत जाण्यास आग्रही असल्याचे दिसून येते.

राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक

राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून  6,  बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, आसामधून 3, तेलंगाणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

हेही वाचा

भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार

आणखी वाचा

Comments are closed.