मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती,पदाधिकारीच अजित दादांसोबत; धनंजय पिसाळ घड्याळावर लढणार
मुंबई : महापालिका (Mumbai) निवडणुकांसाठी एकीकडे काँग्रेस अन् वंचित बहुजन आघाडीची युती झाली असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरे बंधूंसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे, शिवसेना-मनसे आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील (NCP) इच्छुकांची नाराजी उघड होत असून उमेदवारीसाठी या पक्षातील नाराज नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे धाव घेत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून 100 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवारांच्या (Sharad pawar) पक्षातील मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडल्याचं दिसून येतं. शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आज आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुकांची पक्षातून गळती होत असून इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. माजी नगरसेवक तथा शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांच तिकीट उबाठा मनसे युतीत कापलं गेल्यामुळे नाराज धनंजय पिसाळ राष्ट्रवादीत प्रवेशासाठी पोहचल्याचं दिसून आलं. धनंजय पिसाळ यांच्या पाठोपाठ माजी नगरसेविका मनीषा रहाटे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच, शरद पवार यांच्या पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
संजय राऊतांच्या भावाला शिवसेनेकडून विक्रोळीत उमेदवारी देण्यात आली असून धनंजय पिसाळ हे तिथे शिवसेना-मनसे युतीला टक्कर देतील. संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत हे विक्रोळीच्या प्रभाग 111 मधून इच्छुक आहेत. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ हेही तेथून लढण्यास इच्छुक होते. उबाठा आणि मनसेच्या युतीत संदीप राऊत उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यातच, आता शरद पवारही ठाकरे बंधूंसोबत गेले. त्यामुळे, पक्षातून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने पिसाळ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले असून 111 प्रभागातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 52 जागांच्या मागणीचा प्रवास अखेर 10 ते 12 जागांवर येऊन संपला आहे. त्यामुळे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुंबईत कोणाबरोबर जाणार याबाबतची चर्चा सुरु होती. अखेर हा मुद्दा निकाली निघाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाची ठाकरे बंधूंबरोबर युती झाली असून शिवसेना-मनसेकडून राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा देण्यात येणार असल्याचे समजते.
हेही वाचा
मुंबईत शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ; राष्ट्रवादीचं अखेर ठरलं, तुतारी किती जागांवर लढणार, सगळं समोर
आणखी वाचा
Comments are closed.