नेहरू हे ‘नेहरू’ होते, त्यांच्याशी मोदींची तुलना होऊच शकत नाही! इतिहासाचे दाखले देत शरद पवार यांनी भाजपला दाखवला आरसा
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशाला संघटित करण्याचे आणि इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचे ऐतिहासिक काम केले. नेहरू हे ‘नेहरू’ होते, त्यांच्या कर्तृत्वाची आणि देशाच्या इतिहासातील त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही. नेहरू आणि मोदी यांची तुलना करणे अशक्य आहे, असे सुनावत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजपला आरसा दाखवला. पवारांनी इतिहासाचे दाखले दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पदाधिकाऱयांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी देशातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि मोदींची नेहरूंशी केली जाणारी तुलना यावर स्पष्ट भूमिका मांडली. मोदींना अधिक काळ पंतप्रधानपद मिळाले ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या चाहत्यांची ती इच्छा असू शकते; पण ही स्पर्धा नेहरूंशी होऊ शकते का? पंतप्रधान होण्यापूर्वी नेहरूंनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ संघर्ष केला. अनेक वर्षे तुरुंगवास भोगला आणि इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे, हा इतिहासाचा भाग कोणीही विसरू शकत नाही असे पवार म्हणाले.
जाहिरातबाजीवरून अजितदादा गटाला टोला
आज वर्धापन दिनाची जाहिरात ‘टाईम्स ऑफ इंडिया’सह प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली आहे. अशा पहिल्या पानावरील जाहिरातींची किंमत किती अथांग असते, हे सर्वांना माहीत आहे. म्हणूनच आपण कधी त्या रस्त्याने गेलो नाही, मात्र आजच्या कार्यक्रमाला झालेली कार्यकर्त्यांची विराट उपस्थिती हे स्पष्ट करते की, ही जाहिरात केवळ कागदावर मर्यादित राहिलेली नाही, तर ती सर्वांच्या मनामनात पोहोचली आहे, असा टोला शरद पवार यांनी जाहिरातबाजीवरून अजितदादा गटाला लगावला.
इंदिराजींनी देशाची प्रतिष्ठा जगात वाढवली
इंदिरा गांधी जेव्हा मॉस्को विमानतळावर उतरल्या, तेव्हा त्यांच्या स्वागताला त्यांच्या दर्जाचा कोणताही रशियन नेता उपस्थित नव्हता. देशाच्या प्रतिष्ठsशी कधीही तडजोड न करणाऱया इंदिराजींनी तत्काळ तत्कालीन भारतीय राजदूत आय. के. गुजराल यांचे घर गाठले आणि तिथल्या लहान मुलांसोबत खेळणे पसंत केले; मात्र स्वागताचा प्रोटोकॉल न पाळणाऱया रशियन अध्यक्षांची वाट पाहत त्या थांबल्या नाहीत. अशी देशाची प्रतिष्ठा त्यांनी जगात वाढवली होती, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
गिरीश महाजन यांना सुनावले
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी इंदिरा गांधी यांच्यावर केलेल्या टीकेलाही शरद पवार यांनी या वेळी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसच्या लोकांनी शिखांवर हल्ला केला, असे एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन बोलले. त्यांनी लक्षात घ्यावं की, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले आहे. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केले. पाकिस्तानला धडा शिकवला. त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी स्वतःच्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. नेहरू-गांधी कुटुंबाचा त्याग कोणीही विसरू शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.
आज सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक अशा विविध घटकांच्या समस्यांनी देशाला ग्रासले आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नांवर किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे. काही लोक सतत एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की, या देशात असा एखादा नेता पूर्वी झालाच नाही.
मोदींना अधिक काळ पंतप्रधानपद मिळाले ही चांगली गोष्ट आहे, पण स्पर्धा नेहरूंशी होऊ शकते का? पंतप्रधान होण्यापूर्वी नेहरूंनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ संघर्ष केला, अनेक वर्षे तुरुंगवास सोसला आणि इंग्रजांना देशातून बाहेर कायात मोलाची कामगिरी बजावली, हा इतिहासाचा भाग कोणीही विसरू शकत नाही.
महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार
पवार यांनी महागाई, महिला अत्याचार, शेतकऱयांच्या प्रश्नावर आगामी काळात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. आज देशात महिलांवरील अत्याचार आणि महागाईसारख्या गंभीर समस्या कमालीच्या वाया आहेत. देशाचा अन्नदाता म्हणजेच शेतकरीही प्रचंड संकटात आहे.यासंदर्भात पु8 ते 10 दिवसांमध्ये सर्व प्रमुख नेते एकत्र बसून ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनाची रणनीती ठरवतील, असे पवार म्हणाले.
– नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधानपद हे एक संस्थात्मक पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखणे हे प्रत्येक भारतीयाचे काम आहे.आम्ही धोरणात्मक गोष्टींवर नक्कीच टीका करू, पण या सर्वोच्च पदाचा अनादर कधीही करणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला. त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. नेहरू कुटुंबियांचे बलिदान कोणीच विसरू शकत नाही – शरद पवार
Comments are closed.