100 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची निवड
पुण्यनगरीत होत असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य महामंडळाच्या वतीने महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. साहित्यातील आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सायंकाळी पाच वाजता नव्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, आता हे संमेलन २७ ते ३० जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संमेलन होणार आहे.
यापूर्वी संमेलन २८ ते ३१ जानेवारीदरम्यान आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, ३१ जानेवारी रोजी पुण्यात पुणे ग्रँड टूर २०२७ या सायकलिंग स्पर्धेचा समारोप होणार असून, त्यामुळे वाहतूक, नियोजन आणि अन्य व्यवस्थांचा विचार करून संमेलनाचा समारोप एक दिवस आधी म्हणजेच ३० जानेवारीला करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीच्या बैठकीत सोमवारी (दि.२३) घेण्यात आला आहे.
Comments are closed.