पालघरच्या 1 हजार 979 शाळांमधील विद्यार्थी असुरक्षित, सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय कागदावरच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात शाळांमधीलविद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीत पालघर जिल्हा कागदावरच आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या 2 हजार 108 शाळांपैकी तब्बल 1 हजार 979 शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित 2 हजार 108 शाळा असून या शाळांमध्ये तब्बल 1 लाख 55 हजार 359 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे तसेच शाळेच्या परिसरात घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची मानली जाते. विशेषतः विद्यार्थिनींची सुरक्षितता, शाळेतील हालचालींवर देखरेख आणि अनुचित घटनांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज उपयुक्त ठरू शकते. असे असतानाही जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

केवळ 39 शाळांमध्ये कॅमेरे

या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालघर जिल्हा परिषदेच्या केवळ 39 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. उर्वरित शाळांसाठी आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया रखडली आहे. परिणामी पालघर जिल्ह्यातील 1 हजार 979 शाळा आजही सीसीटीव्ही यंत्रणेपासून वंचित आहेत.

नव्याने प्रस्ताव पाठवणार

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शिक्षण विभागाकडून नव्याने प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. मात्र हा प्रस्ताव कधी तयार होणार, त्यानंतर निधी कधी मंजूर होणार? आणि प्रत्यक्षात शाळांमध्ये कॅमेरे कधी बसवणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

Comments are closed.